"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:15 AM2024-07-17T11:15:16+5:302024-07-17T11:37:51+5:30

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

Raj Thackeray post for the Marathi community on the occasion of Ashadhi Ekadashi | "मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं

"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं

Raj Thackeray : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मानाच्या वारकऱ्याच्या हस्ते पहाटे पंढरपूरात विठ्ठलाची महापूजा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना महाराष्ट्रातील सद्याची परिस्थिती पाहून राज ठाकरे यांनी विठुरायाच्या चरणी साकडं देखील घातले आहे. राज्यात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावरुन एक पोस्ट लिहीत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

"आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. 'यात्रा' ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं," असे राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर 'महा'राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही," असं मत राज ठाकरे यांनी मांडले आहे.

"म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे," असेही राज ठाकरेंनी म्हटलं.

Web Title: Raj Thackeray post for the Marathi community on the occasion of Ashadhi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.