राज ठाकरेंना २ हजाराचा दंड
By admin | Published: June 7, 2014 10:00 PM2014-06-07T22:00:16+5:302014-06-08T02:07:46+5:30
दोन सुनावण्यांना गैरहजर राहिल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन हजारांचा दंड कल्याण सत्र न्यायालयाने ठोठावला आहे. म
कल्याण : २००८ मध्ये झालेल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतातून आलेल्या परीक्षार्थींना डोंबिवलीतील विविध परीक्षा केंद्रांवर झालेल्या मारहाण प्रकरणी गेल्या दोन सुनावण्यांना गैरहजर राहिल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन हजारांचा दंड कल्याण सत्र न्यायालयाने ठोठावला आहे. मनसेच्या १६ जणांसह अध्यक्ष राज यांना सहआरोपी करण्यात आले होते. त्याची सुनावणी शनिवारी झाली.
आगामी सुनावणीसाठी ९ जुलै तारीख दिली, परंतु ठाकरेंच्या वकिलांनी या प्रकरणाशी त्यांचा प्रत्यक्ष काही संबंध नसल्याने त्यांचे या प्रकरणातून नाव वगळण्यात यावे, असा युक्तिवाद केला. त्यावर न्या. ए. बी. मारर्लेचा यांनी याप्रकरणी १९ जूनपासून सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार ९ जुलैच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा असल्याची माहिती या प्रकरणातील आरोपी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी दिली. राज ठाकरे वगळता अन्य १५ जणांवरील खटला पुढे सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.(प्रतिनिधी)
दरम्यान ठाकरे यांना रेल्वे न्यायालयाने २१ जून रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे फर्मान काढले आहे.जनप्रक्षोभक असे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे. त्याची ही सुनावणी होणार आहे.
कोर्टानंतर थेट केडीएमसीत
कल्याण : कल्याण न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात येत पुन्हा नव्याने आयुक्तपदी रूजू झालेल्या रामनाथ सोनवणे यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये कोणतीही औपचारीकता न पाळता आणि प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद न करता ते निघून गेले. दरम्यान पत्रकारांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या नाट्यमय घडामोडींबद्दल छेडल्यावरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.