राज ठाकरेंनी मुद्दा मांडला अन्...; शिंदे-फडणवीस सरकारचं अभिनंदन; माहीम मजार वादावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:16 PM2023-03-23T12:16:30+5:302023-03-23T12:17:41+5:30
"...तर आम्ही शेजारीच सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे."
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात माहिमच्या समुद्रातील एका अनधिकृत बांधकामासंदर्भात थेट व्हिडिओच दाखवला होता. एवढेच नाह, तर गेल्या २ वर्षात तेथे कथित मजार बांधण्यात आली, अनधिकृत बांधकाम करण्यात आले. मात्र याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. याच बरोबर या ठिकाणावर कारवाई झाली नाही. तर आम्ही शेजारीच सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळे म्हणाले, अनेक गोष्टी अशा असतात ज्या सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र मला अभिमान आहे की, राज ठाकरे यांनी काल यासंदर्भात (माहीम येथील मजार) माहिती देताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तातडीने यावर कारवाई सुरू केली. यासाठी मी दोघांचेही अभिनंदन करतो. याच बरोबर, हे सरकारच्या निदर्शनास आणून दिलं यासाठी मी राज ठाकरे यांचेही अभिनंदन करतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
याच बरबोर, ज्या पद्धतीने प्रतापगडावरची कारवाई झाली. आज माहीमची कारवाई झाली किंवा होणार आहे. याच पद्धतीने जिथे जिथे कुठलेही अतिक्रमण असतील ती सरकारने काढायला हवीत. तसेच, समाजात कुठल्याही प्रकारचे वैर निर्माण होणार नाही, यासाठीही सरकार काळजी घेईल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो दोघेही नेते संवेदनशील आहेत. असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांचे भाषण दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे होते, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे असे काही बोलले असे मला वाटत नाही. उलट त्यांनी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन मांडलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुकच केले. तसेच देशात राहून जे देशा विरुद्ध बोलणे, देशात राहून पाकिस्तानचे ध्वज फडकावणे, अशा लोकांना त्यांचा विरोध आहे. त्यांचा विरोध सर्वच मुस्लिमांना नाही. जे एक टक्का लोक या देशाचे वातावरण खराब करतात त्यांविरुद्ध राज ठाकरे यांनी भूमिका आहे. त्यांनी कुठलीही धार्मिक तेढ निर्माण केलेली नाही. तसेच, देशासाठी कुठेही भांडायला तयार आहेत, आपला देश मांडायला तयार आहे. जो भारत देश आणि संविधान मानतो, ज्याला देशाचा अभिमान वाटतो. असे लोक आपल्याला हवे आहेत अशीच भूमिका त्यांची आहे, असेही बावनकुळे म्हणाले.