राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी, म्हणाले डीएसके चिटर नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 02:06 PM2017-11-24T14:06:33+5:302017-11-24T14:13:57+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत.
पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत. डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन राज ठाकरेंनी गुंतवणूकदारांना केलं आहे. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यात बैठक झाली.
‘आज काही राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित अमराठी लोक त्यांना उध्वस्त करु पहात आहेत. तसं होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहीजे’.अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत,असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. पुणे सत्र न्यायालयाने डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने तीनवेळा डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ दिली.
डीएसकेंना कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या 30 तारखेला डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिले आहेत. डीएसकेंच्या साडे आठ हजार हजार गुंतवणूकदारांपैकी सातशे ते आठशे गुंतवणूकदार राज ठाकरेंसोबतच्या या बैठकीला उपस्थित होते.
विजय मल्ल्याप्रमाणे पळून नाही जाणार,आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार
गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही़ आता त्यातून बाहेर पडत आहे. उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा आराखडा देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत. विजय मल्ल्याप्रमाणे कोठेही पळून जाणार नाही, असे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके)यांनी म्हंटलं होतं.