मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 02:31 PM2024-02-02T14:31:30+5:302024-02-02T14:31:59+5:30
Raj Thackeray And Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
Raj Thackeray And Manoj Jarange Patil: शासनाने सगेसोयरेबाबत अधिसूचना काढली, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र वाटप होत नाही. सगेसोयरेबाबत कायदा तयार करून तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगारणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांना त्या दिवशी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर्वांसमोर सांगितले होते की, हे होणार नाही. हा विषय तांत्रिक आहे. हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. अशा प्रकारचा निर्णय कोणत्याही राज्याचे सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला करायचे असेल, तर प्रत्येक राज्यात अशी परिस्थिती आहे. मग प्रत्येक राज्यात हे कसे करणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे लागेल. यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. ही गोष्ट इतकी सोपी नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे की...
मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे की, मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले. मुंबईत महामोर्चा आला. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. आताही तेच झाले. वस्तुस्थिती कोणी पाहणार आहे की नाही. कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि मोर्चे म्हणून तुम्हाला घेऊन येत आहेत. हे प्रत्येक समाजाने पाहिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मग आता पुन्हा उपोषणाला का बसताय?
त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. ते तिथून बाहेर पडल्यानंतर विजयोत्सव साजरा झाला. काय विजय मिळाला? कोणता विजय? हे तर समजू देत. जे मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते, त्यांना कळले का काय झाले ते? आणि जर झालेले नाही आणि तुम्ही आनंद व्यक्त केला होता, मग आता पुन्हा उपोषणाला का बसताय? तुमच्यामते ती गोष्टी आता झाली ना. मग आता पुन्हा उपोषण कशासाठी? मी जे बोलतो ते कडवट वाटते नंतर ते कळते सत्य आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.