बुलेट ट्रेनच्या लाडापायी सुरेश प्रभुंना रेल्वे मंत्री पदावरून हटवलं- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 01:20 PM2017-09-30T13:20:35+5:302017-09-30T13:23:27+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. इतकं खोटं बोलणारे पंतप्रधान कधीही पाहिले नसल्याची थेट टीका राज ठाकरे यांनी केली. तसंच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं कौतुक करत रेल्वे मंत्री बदलण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं नाही ? बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभुंना हटवलं आणि पियूष गोयल यांना आणलं. पियूष गोयल काय आधी टीसी होते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. बुलेट ट्रेनला सुरेश प्रभू यांनी विरोध केला म्हणूनच त्यांचं रेल्वेमंत्रिपद काढून घेतलं, अशी टीका याआधीही करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून सुरेश प्रभु यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेतल्याचं म्हंटलं होतं. यानंतर आता राज ठाकरे यांनी तशीच टीका केली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आले असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. बुलेट ट्रेनला आपला विरोध असल्याची भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली होती. बुलेट ट्रेनमुळे जपानमध्ये अक्षरश: बंद पडलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. या ट्रेनमुळे आपल्या देशाचा कमी आणि जपानचाच जास्त फायदा आहे, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती.
मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही; राज ठाकरेंचं मोदींना आव्हान
शहरातील रेल्वे स्थानकांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. बुलेट ट्रेनचे जे काही बांधकाम करायचे असेल ते मोदींनी आपल्या गुजरातमध्ये करावे. पण, मुंबईत बळजबरीने बुलेट ट्रेनचे काम करायचा प्रयत्न केल्यास त्याला ‘मनसे’कडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं सांगत राज यांनी थेट मोदींना आव्हान दिलं आहे.आपल्याकडे आहेत त्या गोष्टी होत नाहीत. आणि नवीन गोष्टी सरकारकडून आणल्या जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुंबईमधील रेल्वे स्टेशन आणि ट्रेनची परिस्थिती जोपर्यंत सुधारली जाणार नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही, असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.
'भाजपासोबत खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना', राज ठाकरेंची शिवसेनेवर सडेतोड टीका
एका बाजूने म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग बसलात कशाला तिकडे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला विचारला आहे. एल्फिन्स्टन घटनेचा निषेध करणा-या शिवसेनेवर टीका करताना राज ठाकरे बोलले की, 'तुम्ही आहात ना बसलात ना सत्तेमध्ये, खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना त्यांच्याबरोबरीने. हे शिवसेनेचेच लोक आहेत ना जे तिकडे खासदार, मंत्री होऊन बसलेत, इथेही मंत्री होऊन बसलेत ना. एका बाजूने म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग बसलात कशाला तिकडे. दांभिक खोटे आहेत हे सगळे'. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शिवसेनेवरही टीका केली