धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने राज ठाकरे दु:खी, पण...; कुणाला धरलं मनसेनं जबाबदार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 02:48 PM2022-10-09T14:48:02+5:302022-10-09T14:48:36+5:30
राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही असं प्रकाश महाजन म्हणाले.
औरंगाबाद - निवडणूक आयोगाचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी एखाद्या पक्षावर ही वेळ यावी ही दु:खद घटना आहे. याचं कुठेही राजकीय भांडवल करावं हा माझ्या नेत्याचा स्वभाव नाही. नामुष्कीची वेळ आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. निष्पाप असल्याचं बुरखा पांघरतात. राजकारणात शपथा घेऊन चालत नसतं. मृत माता-पित्याचा आधार घ्यावा लागला. सल्लागार चुकीचा असल्यावर काय होऊ शकतं हे उद्धव ठाकरे उदाहरण आहेत अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, आज बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना पक्ष उभा केलाय. राज ठाकरेही आनंदित झाले नसतील. परंतु उद्धव ठाकरे अहंकारात बुडाले होते. राजकारणात डावपेच सुरू असतात. आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ज्यांना जायचं त्यांनी जा, दरवाजे उघडे आहेत अशी भाषा वापरली. प्रत्येक जण चुकीचा हे बरोबर असं होत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच राज ठाकरे धनुष्यबाण गोठवल्याने दु:खीच असतील. राजकारण राजकारणासारखं असते. राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा कित्येक आमदार, नगरसेवक त्यांच्यासोबत येणार होते. परंतु कधीच कुणाला बोलावलं नाही. राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही. सेनापती कुशल, लोकप्रिय असेल तर पराभवातून उभं राहून विजय मिळवू शकतो. सेनापती कटकारस्थान करणारा असेल तर तो उभे राहू शकत नाही असा खोचक टोलाही मनसेने उद्धव ठाकरेंना लगावला.
सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता
इंदिरा गांधी, शरद पवार बाहेर पडले तेव्हा मूळ पक्षाला फायदा झाला नाही. काही अपवादात्मक असू शकतात. युती तोडली हेच उद्धव ठाकरेंची चूक झाली. मी खरा आहे दाखवण्यासाठी मृत आईवडिलांची, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी लागली. सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने थोडीफार जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या निर्णय खेदजनक आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या निर्णय योग्य असू शकतो. परंतु ही वेळ पक्षप्रमुखांमुळे आली असंही मनसेने म्हटलं.