राज ठाकरेंकडून वसंतदादांच्या आठवणींना उजाळा, जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचीही विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 01:17 PM2018-01-14T13:17:09+5:302018-01-14T13:18:56+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दलही त्यांनी विचारपूस केली.
सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दलही त्यांनी विचारपूस केली.
औदुंबर येथील साहित्य संमेलनाकरीता राज ठाकरे शनिवारी रात्रीच सांगलीत आले होते. रविवारी सकाळी वसंतदादांच्या स्मारकाचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. याबाबतची कल्पना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनाही दिली होती. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता ठाकरे आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत कृष्णा नदीकाठच्या स्मारकाच्या ठिकाणी आले. त्याठिकाणी प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. दादांच्या समाधीस्थळास त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रतीक पाटील यांच्याशी संवाद साधला.
दादांची एक आठवण सांगताना ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा दादांना मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेटलो तो प्रसंग अजूनही आठवतो. दादांनी आत बोलावल्यानंतर ते लुंगी आणि बनियनवर बसले होते. ते कॉटवर बसल्यानंतर त्यांनी मला बसण्याची विनंती केली. इतका साधेपणा दादांनी जपला होता. दादांच्या भेटीबद्दल मी जो विचार केला होता त्या विचारापलिकडे दादांचा साधेपणा मला दिसला. खरेच ती व्यक्ती ग्रेट होती, असे ते म्हणाले. त्यानंतर प्रतीक पाटील यांनीही दादांच्या आठवणी ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. यावेळी ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर, माजी आमदार नितीन शिंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, अॅड. स्वाती शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : ठाकरे
जन्मशताब्दी वर्षाचे कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल आणि स्टेशन चौकातील स्मारकाच्या उर्वरीत निधीबाबत शासन उदासिन असल्याची माहिती अॅड. स्वाती शिंदे यांनी ठाकरे यांना दिली. याबाबत प्रतीक पाटील यांच्याशी ठाकरे यांनी चर्चा केली. दादांच्या स्मारकाच्या निधीचा प्रश्न आणि जन्मशताब्दी वर्षातील कार्यक्रमांबाबत मी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेल, असे आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिले.