"राजधानी हातातून गेली की..."; राज ठाकरेंचं मराठी अस्मितेचं 'ते' व्यंगचित्र अन् मनसेची सूचक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:18 PM2023-09-30T13:18:32+5:302023-09-30T13:22:45+5:30
Raj Thackeray, Marathi Mumbai: मराठी माणसाला मुंबईत जागा नाकारल्याच्या मुद्द्यावर व्यंगचित्रातून भाष्य
Raj Thackeray Caricature on Marathi Mumbai Issue: सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मराठी पाट्यांबद्दलचा निर्णय दिला. महाराष्ट्रात दोन महिन्यात दुकानांवर सर्वत्र मराठी पाट्या झळकल्या पाहिजे असा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरूद्ध परप्रांतीय हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यातच मराठी माणासाला मुंबईत, मुलुंडमध्ये जागा नाकारण्यात आल्याचा किस्सा घडल्याने सारेच पेटून उठले. मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर एकबोटेंना केवळ मराठी (महाराष्ट्रीयन) असल्याने जागा नाकारण्यात आली. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. वाद सुरू झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वप्रथम तृत्पी यांची मदत केली आणि आक्रमक भूमिका घेत परप्रांतीयांची मुजोरी हाणून पाडली. तृप्ती यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले, तसेच त्यांच्यासारखा कोणावरही अन्याय होत असेल तर त्यांनी आवाज उठवा असे सांगितले. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काढलेले एक जुने व्यंगचित्र मनसे अधिकृतने शेअर केले असून त्यासोबत सूचक संदेशही दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून मराठी माणसाच्या अस्मितेवर भाष्य केल्याचे एक व्यंगचित्र काढले होते. मराठी अस्मिता ही ठिगळं जोडलेली आहे, तिच्यात एकसंधता नाही, अशा आशयाचे हे व्यंगचित्र असल्याचे दिसते. या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी आपल्या भावना अस्खलितपणे मांडल्या होत्या. राज ठाकरेंनी व्यंगचित्रात तमिळ, पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिलांचं चित्र रेखाटलं आहे. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला मात्र ठिगळं असलेली साडी नेसून उभी असल्याचे चित्रण केले आहे. त्यातही मराठी अस्मिता असलेली स्त्री ब्राह्मण, आगरी, माळी, मराठा, दलित, मातंग, वंजारी आणि इतर जातींमध्ये विभागली आहे असे त्यांनी दाखवले आहे. म्हणजेच, इतर लोक त्यांची अस्मिता एकसंधतेने सांभाळतात पण मराठी माणूस आपसातच भांडत बसला आहे, असा संदेश त्यांनी या व्यंगचित्रातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं... आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूसpic.twitter.com/K3N6L2N3kZ
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 30, 2023
राज ठाकरेंनी काढलेले हे व्यंगचित्र मनसे अधिकृतने ट्विटरवर शेअर केले आहे. यासोबत असे लिहिण्यात आले आहे की, राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं. आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे, पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. यासोबत त्यांनी मराठी माणूस हा हॅशटॅगही दिला आहे. यातून राज यांच्या मनसैनिकांनी, जातीय भिन्नता विसरून मराठी या नात्याने एकत्र येण्याचा संदेश दिला आहे.