Raj Thackeray:राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, शिराळा कोर्टाकडून 'त्या' प्रकरणात अटक वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:02 PM2022-05-03T12:02:55+5:302022-05-03T12:30:03+5:30
Raj Thackeray Arrest Warant: शिराळा कोर्टातून 2012 मधील एका प्रकरणात राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
सांगली :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा (जि. सांगली) येथील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. हे वॉरंट १४ वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात काढण्यात आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
२००८ साली रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपूत्रांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी राज ठाकरे यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात राज ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ठाकरे यांच्या अटकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात बंद पुकारला. कार्यकर्त्यांनी गावातील दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले होते. विनापरवाना बंद पुकारल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांविरोधात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे, तानाजी सावंत यांच्यासह १० जणांवर आरोपपत्रही दाखल करण्यात आले. काही वर्षापूर्वी ठाकरे हे या सुनावणीसाठी न्यायालयातही हजर झाले होते. त्यानंतरच्या सुनावणीला ते हजर न राहिल्याने न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. हे वॉरंट एप्रिल महिन्यात बजाविण्यात आले असून मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यात खळबळ उडाली आहे.
त्रास देण्याचा सरकारचा डाव
मराठीच्या मुद्दावर आम्ही आंदोलन केले होते. या प्रकरणी शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयीन सुनावणीसाठी राज ठाकरे हे एकदा न्यायालयात हजरही झाले होते. आता पुन्हा न्यायालयाने वॉरंट बजाविले आहे. ठाकरे यांनी आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकल्याने हे जुने प्रकरण उकरून काढून त्यांना त्रास देण्याचा सरकारचा डाव आहे. - तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष मनसे.