'राज ठाकरेंनी पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 02:13 AM2019-08-04T02:13:39+5:302019-08-04T06:42:06+5:30
विधानसभेला १० जागांची मागणी
पुणे : राज ठाकरे यांना कसला उद्योग राहिलेला नाही, त्यामुळे ते इव्हीएमच्या मागे लागले आहेत. ममता बॅनर्जींना भेटण्याऐवजी त्यांनी पक्षवाढीकडे लक्ष केंद्रीत करावे, सगळे विरोधक गलितगात्र झाले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन काम करत आहेत, त्यामुळे सन २०२४ नंतरच्या निवडणूकीतही आम्हीच विजयी होणार आहोत अशी जोरदार फटकेबाजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पुणे दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी सरकारी विश्रामगृहात पत्रकारांबरोबर संवाद साधला. विधानसभेला आम्ही भाजपाकडे २२ जागांची मागणी केली आहे. तसे पत्रच त्यांना दिले आहे. १० जागा मिळाल्याच पाहिजेत. त्यात पिंपरी व पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदार संघांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले.
आठवले म्हणाले, विकासाच्या राजकारणामुळे देशातील जनता मोदी त्यांच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहूल यांनी राजीनामा द्यायला नको होता. पक्ष उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. तिहेरी तलाकवर काँग्रेसने घेतलेली भूमिका चुकीची आहे.
वंचित आघाडीचा फायदा भाजपला होतो
या मुद्द्यात काही तथ्य नाही, निवडणुकीतील मतदानाने ते सिद्ध केले आहे. काही जागांवर त्यांना मताधिक्य मिळाले असले, तरी आता त्यांच्यात फूट पडली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांची मूळीच भीती नाही.
राजा ढालेंच्या स्मृती जपणार
राजा ढाले यांनी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच चळवळीला वैचारिक मांडणीही दिली. पुस्तके हा त्यांचा ध्यास होता. रमाबाई आंबेडकर नगर येथे भव्य ग्रंथालय तयार करून त्यांच्या स्मृतीची जपणूक करण्याचा निर्धार आंबेडकरी चळवळीतील विविध कार्यकर्त्यांनी शनिवारी झालेल्या ढाले यांच्या अभिवादन सभेत केला. यासाठी ४० लाख रूपयांचा खासदार निधी देणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.