Raj Thackeray: ...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 01:53 PM2020-02-14T13:53:59+5:302020-02-14T14:03:19+5:30

अनेक लोक आपल्या भूमिकांना मुरड घालून सत्तेत गेल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला. 

Raj Thackeray slams Shiv Sena; MNS is fighting for hindutva since many years | Raj Thackeray: ...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक

Raj Thackeray: ...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक

Next
ठळक मुद्देमनसेनं हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.राज ठाकरे आणि भाजपामधील जवळीक वाढत असल्याचं बोललं जातंय.मनसेच्या झेंड्यात बदल झालाय, या पलीकडे भूमिकेत बदल झालेला नाहीः राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा, त्याचा रंग आणि त्यावरची राजमुद्रा हा सध्या चर्चेचा विषय आहे. मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचा मुद्दा घेऊन राजकीय वाटचाल करणाऱ्या मनसेनं हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानं, राज ठाकरे आणि भाजपामधील जवळीक वाढत असल्याचं बोललं जातंय. त्यावरून सुरू असलेल्या टीका-टिप्पणीत, शिवसेनेचाच हिंदुत्वाचा मुद्दा मनसेनं उचलल्याचं शिवसेना नेते म्हणताहेत. या मंडळींचा राज ठाकरेंनी आज समाचार घेतला. 

मनसेचं अधिवेशन आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईत काढलेल्या महामोर्चानंतर, राज ठाकरे यांनी काल पुण्यात दगडूशेट गणपतीचं दर्शन घेतलं आणि ते आज औरंगाबादमध्ये आहेत. त्यावेळी पत्रकारांनी, मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागची आणि अजेंड्यामागची भूमिका त्यांना विचारली. तेव्हा, शिवसेनेचं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आणि आपल्या नव्या झेंड्याचा, हिंदुत्वाच्या मुद्द्याचा काहीही संबंध नसल्याचं राज यांनी सांगितलं.  

'मी भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्याची भूमिका आम्ही मांडली. रझा अकादमीविरोधात मोर्चा आम्ही काढला. मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत ही मागणी मी अनेक वर्षं करतोय. जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात त्यांनी यातलं काही केलं का? मनसेच्या झेंड्यात बदल झालाय, या पलीकडे भूमिकेत बदल झालेला नाही, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं. मुंबईतील बांगलादेशी रिक्षा-टॅक्सीचालकांविरोधात मनसेनं केलेल्या आंदोलनानंतरच या रिक्षा-टॅक्सी कापल्या गेल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करून दिली. ज्या प्रकारची कृती आवश्यक होती, ती फक्त माझ्या पक्षाकडून घडली. तेव्हा तथाकथित हिंदुत्ववादी कुठे होते? त्यांनी तर तेव्हा साथही दिली नव्हती, अशी चपराक त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावली.

हिंदुत्वाचा मुद्दा तसं तर मुळात जनसंघाचा आहे. मुद्दा नवा नसतो, तो सुरूच असतो. फक्त कोण तो कशाप्रकारे मांडतो आणि कसा पुढे नेतो, हे महत्त्वाचं असल्याचं राज म्हणाले. अनेक लोक आपल्या भूमिकांना मुरड घालून सत्तेत गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

हिंदुत्वाचा मुद्दा घेतला म्हणजे विकासाचा मुद्दा सोडला असा अर्थ होत नाही. तसंच, मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून आणि धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असं मी आधीच स्पष्ट केलं आहे. झेंड्याची नोंदणीही चार वर्षांपूर्वी केली होती, त्याचं अधिकृत लाँचिंग फक्त आत्ता केल्याचंही राज यांनी सांगितलं. 

'हिंदूजननायक राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये हार्दिक स्वागत', असे बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये लावण्यात आले आहेत. त्याबद्दल राज यांना प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडले. 'मी असं काही मानत नाही. याआधी माझ्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावेळी, मी असं काही करू नये अशी ताकीद दिली होती, असं राज यांनी निक्षून सांगितलं. 

Web Title: Raj Thackeray slams Shiv Sena; MNS is fighting for hindutva since many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.