Raj Thackeray vs Uddhav Thackeray: "हे लोक ढोंगी, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं"; राज ठाकरेंची उद्धव यांच्यावर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 08:12 PM2022-07-23T20:12:01+5:302022-07-23T20:12:45+5:30
"हे आधी आजारी होते, मंत्रालयातही जात नव्हते पण आता शिवसेना भवनात जातात"
Raj Thackeray vs Uddhav Thackeray: सध्या राज्यात एक विचित्र असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सध्या शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आहे. पण या सरकारचे भवितव्य कोर्टात ठरवलं जाणार आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस चारही पक्ष सध्या या प्रकरणात समाविष्ट आहेत. पण या साऱ्यापासून दूर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र वेळोवेळी रोखठोक भूमिका घेतली आहे. आजही त्यांच्या भूमिकेकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अतिशय जहरी टीका केली.
"बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली. प्रखर हिंदूत्व म्हणजे काय ते बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलं पाहिजे. बाळासाहेबांचा हा विचार कोण जिवंत ठेवतंय हे आता लोकांनी पाहावं. पण हे लोक ढोंगी आहेत. बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून घेतात आणि पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं. नंतर फटका बसला की एवढंसं तोंड करून बसायचं. हे आधी आजारी होते, मंत्रालयातही जात नव्हते पण आता मात्र शिवसेना भवनात जातात. मला कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात किंवा कुणाच्या कुटुंबात जायचं नाही. पण हा विचार झालाच पाहिजे", अशा शब्दांत झीचोवीसतासच्या मुलाखतीत त्यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
राज ठाकरे यांनी या मुलाखतीत इतरही अनेक विषयांवर आपली मतं मांडली. मुंबई महापालिकेत जर मनसेची सत्ता आली तर आम्ही याआधीही कधीही लोकांनी जे पाहिलं नसेल असा विकास करून दाखवू. तो विकास नक्की कसा करायचा हे मात्र मी माझ्या जाहीरनाम्यातून स्पष्ट करेन, असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्यामुळेच शिवसेनेचा खिंडार पडले. त्यांनी योग्य पद्धतीने गोष्टी पुढे नेल्या नाहीत, असा मुद्दा त्यांनी मांडला. मीडियावरही त्यांनी टीका केली. कोणी तरी एखादा पत्रकार अमित ठाकरेंच्या बद्दल काहीतरी स्वत: लिहितो आणि त्यावर प्रतिक्रिया द्यायला लावतो. मग तेच पुढे चालवलं जातं. याचं कारण २४ तास बातम्या चालवण्यासाठी तुम्हाला जो कोळसा लागतो तो तुम्ही असा निर्माण करता, असा खोचक टोलाही राज यांनी लगावला.