जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 01:19 PM2023-08-16T13:19:09+5:302023-08-16T13:20:30+5:30
आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही असं राज ठाकरे म्हणाले.
पनवेल – २०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग लोकांसाठी खुला होईल असं सांगतायेत. आनंद आहे. परंतु आत्ताच्या गणपतीचे काय? गेल्या १० वर्षात या महामार्गावर अडीच हजार माणसे दगावली. अपघातात कुटुंब गेली. टायर फुटतायेत. एकमेव कारण म्हणजे या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कसेही वागलो, काहीही केले तरी हे लोक आम्हाला मतदान करणार आहे अशी मानसिकता त्यांची झालीय अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींवर घणाघात केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, रस्ते खराब व्हायचे बंदच होणार नाहीत. हा एखादा रस्ता २५-३० वर्षासाठी चांगला केला तर पैसे खाणार कसे? हा धंदा आहे. रस्ते खराब झाले तर नवीन टेंडर, नवीन पैसे, नवीन टक्के हे सगळे सुरू आहे. एकमेकांवर ओरडतायेत. जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविडपण सोडला नाही. निवडणूक आल्यावर बाळासाहेबांचे नाव पुढे करायचे. अनेकदा मी पुण्यात मी भाषण केले. मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही मी म्हटलं होते. नगररचना नावाची गोष्ट नाही. पुण्यात आज गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोण यंतेय, कुठे राहतंय त्याचा पत्ता नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पनवेल येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
तसेच आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही. राज्याकडून होत नसेल तर केंद्राने दखल घ्यावी असं मी नितीन गडकरींना सांगितले. पण ते म्हणाले मी लक्ष घातले पण ते कंत्राटदार पळून गेलेत. भाषणापुरता मर्यादित राहू नये. नाणारचा प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू पुढे आले. ५ हजार एकर जमीन कोणी विकत घेतली? चिरीमिरीसाठी कोकणी माणसं जमीन विकतायेत. कुंपणच शेत खातंय. आपल्याच लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात जमीन घालतायेत असा आरोपही राज यांनी केला.
...तर मला देशद्रोही ठरवतात
२०२३ मध्ये गोव्यात कायदा केलाय, गोव्यातील शेतजमीन ती सहज कोणाला मिळणार नाही. शेतजमीन घ्यायची असेल तर तिथे शेतीच करावी लागेल. दुसरा धंदा करता येणार नाही असा कायदा आहे. तिथे भाजपाचे सरकार आहे. भाजपाचे मुख्यमंत्री असा कायदा करतायेत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणातात, आम्ही गोव्याचे गुडगाव किंवा छत्तीसपूर होऊ देणार नाही. उत्तरेकडून येणाऱ्या लोकांना आम्ही गोव्यात जमीन देणार नाही असं ते सांगतात. परंतु इथे राज ठाकरे काय बोलला तर तो देशद्रोही होतो असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
पुन्हा परप्रांतीय टार्गेट
कलम ३७० काढला, आधी जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेता येत नव्हती आता घेता येऊ शकते. जाऊन घ्या, तिथे मुकेश अंबानी, अदांनींना जमीन घेता येत नाही, आपलं सोडा. मिझोराम, हिमाचल प्रदेश तिथे जमीन घेता येत नाही. काही राज्यांना वेगळे कायदे असतात. महाराष्ट्रात सगळीकडून लोकं येतायेत आणि सगळ्या शहराची विल्हेवाट लागते. रस्ते बांधल्यानंतर जे पुढचे धोके आहेत त्याचा विचार करणार नाही का? शिवडी नाव्हाशेवा रस्ता सुरू झाला की रायगड जिल्ह्याचे काय होईल बघा, इतक्या बाहेरच्या लोकांनी तिथे जमीन घेतल्या आहेत. मूळ जमीन ज्याची त्याने विकली आणि तोच ज्याने जमीन घेतली त्याच्याकडे नोकरी करतोय असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीय मुद्दा अधोरेखित केला.
शिवसेनेचे आमदार-खासदार काय करतायेत?
महाराष्ट्रात अनेक पिढ्यानपिढ्या राहणारी लोकं आहेत. आपल्या पक्षात आहे. माझ्यादृष्टीने ते मराठीच आहेत. आपल्या कोकणातील मंडणगडचा तालुकाध्यक्ष सरदार आहे. त्याच्याशी बोलताना कधीही तो मराठी नाही हे समजणार नाही. त्याचे कुटुंब मराठी बोलते. १६-१७ वर्षे रस्ते बांधायला लागतात. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होते. मग कोकणातील आमदार-खासदार काय करतायेत? कोण रेटा लावतंय? शिवसेनचे अनेक आमदार, खासदार निवडून दिले काय करतायेत ते? दरडी कोसळतायेत, रस्ते अपघात होतायेत, माणसे मरतायेत काय करतायेत? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.