Raj Thackeray: "मशिदीवरील भोंग्याचा विषय आता कायमचा संपवायचा," राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:46 PM2022-06-02T17:46:31+5:302022-06-02T18:05:44+5:30
Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत विशेष सूचना केली आहे.
Raj Thackeray MNS :मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरू केलेला मशिदीवरील भोंग्यांचा विषय शांत होताना दिसत होता, पण आता राज ठाकरेंनी पुन्हा या विषयाला हवा दिली आहे. राज ठाकरेंनी यांनी आज एक पत्र ट्विट करत मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. आपल्या पत्रात 'मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा', असे म्हटले आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी... pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022
राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. ते पत्र जारी करत मशिदीवरील भोंग्याचा विषयाला पुन्हा हवा देण्याचे काम राज यांनी केले आहे. राज्यात भोंग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाऊन राज ठाकरेंचे पत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातमी- "आंदोलन पुढे चालूच राहील, तुम्हीही हातभार लावा", राज ठाकरेंचे राज्यातील नागरिकांना आवाहन
राज ठाकरे पत्रात काय म्हणाले?
राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात, "माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात गातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय़ आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचं आहे- माझं पत्र तुम्ही राहात्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही."