"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 09:41 AM2024-09-26T09:41:53+5:302024-09-26T09:45:45+5:30
शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी २००० साली राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची सुरूवात केली होती. पण, ते परत राजकारणात आले. राज ठाकरेंसोबत असं काय घडलं?
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून राजकारणच सोडणार होतो, तसा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट केला. एका कार्यक्रमात ते बोलत होते. '२००० साली पक्षातील (शिवसेनेतील) राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता. मी हळूहळू राजकारण सोडत होतो; पण नाडियावालांमुळे पुन्हा राजकारणात आलो", असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेत असताना राज ठाकरे सोडणार होते राजकारण
एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मी २००० साली, ज्यावेळी एका वेगळ्या पक्षात (शिवसेनेत) होतो; त्यावेळी त्या पक्षात जे काही राजकारण सुरू होते, त्याला कंटाळून मी रिव्हर्सचा गियर टाकला होता. मला असं वाटतं होतं की, नको ते राजकारण! मला त्या राजकारणात जायचंच नाही. माझी तशी इच्छाच नाहीये. मला असले गोंधळ घालायचे नव्हते. मला कोणतेही धक्के द्यायचे नव्हते."
साजिद नाडियावालांमुळे पुन्हा राजकारणात आलो -राज ठाकरे
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मी राजकारण हळूहळू सोडत होतो. त्यावेळी मी साजिद नाडियावालांना अनेकदा भेटायचो आणि बोलायचो की, आपल्याला फिल्म प्रोडक्शन सुरू करायचं आहे. मला फिल्म प्रोड्यूस करायच्या आहेत, वगैरे वगैरे. एकेदिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याचे कारण साजिद नाडियावाला आहेत. हेही त्याचं एक अंग आहेत", अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.
नाडियावाला राज ठाकरेंना काय म्हणालेले?
"त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, राज भाई मी एक प्रोड्यूसर आहे. प्रोड्यूसर कशाप्रकारे काम करतात ते मला माहिती आहे. काय काय करावं लागतं, ते मला माहिती आहे. राज ठाकरेंना प्रोड्यूसर बनून ते करताना मी बघू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात, तिथेच राहा. चित्रपट बनत राहणार. त्यानंतर मी परत राजकारणात सक्रिय झालो आणि परत त्या गोष्टी सुरू झाल्या", असा किस्सा राज ठाकरेंनी उपस्थितांना सांगितला.