राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 07:09 IST2025-04-20T07:08:55+5:302025-04-20T07:09:50+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राजकीय क्षेत्रात उमटल्या उलटसुलट प्रतिक्रिया

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
मुंबई : राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असताना “हा महाराष्ट्र हिताचा विषय असून, त्याचे महाराष्ट्र स्वागत करीत आहे”, असे सांगत यापुढे दोन्ही नेत्यांत चर्चा होण्याचे संकेत उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिले आहेत.
हे दोघे एकत्र येत असतील तर आमची काहीच हरकत नाही, असे भाजपची नेतेमंडळी म्हणत आहेत. तर हे घडणे शक्य नाही आणि घडल्यास आम्हाला काहीच फरक पडणार नाही, असे शिंदे गटातून सांगितले जात आहे.
बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आमचा प्रवास झालेला आहे, तो आम्ही विसरू शकत नाही. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे भाऊ आहेत हे नाकारणार आहात का? ही रक्ताची नाती आहेत, आता कुठे राज ठाकरेंनी त्यांचे मन मोकळे केले आहे, त्यावर उद्धवजींनी प्रतिसाद दिला आहे. थांबा, वाट बघू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विश्वास कसा ठेवायचा?
उद्धव ठाकरे यांनी याआधी राज ठाकरेंना २०१४ आणि २०१७ साली धोका दिला. आमची जीभ आधीच पोळली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आता जे महाराष्ट्राचे शत्रू असे तुम्हाला वाटते त्यावेळी ते शत्रू नव्हते का? सत्तेचा वाटा मिळत होता त्यावेळी भाजप यांच्यासाठी चांगला होता. पण २०१९ नंतर फिस्कटले आणि भाजप त्यांना महाराष्ट्राचा शत्रू वाटायला लागला. आता ते शरद पवार आणि काँग्रेसला धोका द्यायला तयार आहेत. -संदीप देशपांडे, मुंबई अध्यक्ष - मनसे
भाजपला महाराष्ट्रातून ठाकरे नाव संपवायचे आहे
भाजप आणि त्यांच्या बगलबच्चांना महाराष्ट्रातून ठाकरे नाव नष्ट करायचे आहे, अशा वेळी जर दोन्ही प्रमुख ठाकऱ्यांनी साद आणि प्रतिसाद दिला असेल तर त्याचे महाराष्ट्र स्वागत करत आहे. मुंबईच्या लढ्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीत अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्यण घेतला होता, आम्ही त्याच पठडीतील कार्यकर्ते आहोत, असेही राऊत म्हणाले.
भाजपला अडचण नाही
राज ठाकरेंनी गत लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाला साथ दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत जमणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. खरे तर राज ठाकरे यांनी काय करावे? हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, मराठी भाषेकरिता आम्ही सर्व एकत्र आहोत. राजकीय प्लॅटफार्म वेगळा असला तरी मराठी भाषेसाठी आम्ही सर्व जिवाचं रान करणारे लोकं आहोत. -चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री
उद्धव ठाकरे यांना खूप अहंकार आहे, हा अहंकारच राज ठाकरे यांच्यासोबत जाताना त्यांना आडवा येईल. त्यामुळे हे दोघे बंधू एकत्र येण्याच्या नुसत्या चर्चाच ऐकायला मिळतील.
-संजय शिरसाट, शिंदेसेनेचे प्रवक्ते तथा सामाजिक न्यायमंत्री
मराठी माणूस म्हणून सगळ्या शक्ती एकत्र येणे गरजेचे आहे. पण, न्यूज चॅनलमध्ये बोलून प्रस्ताव देता येत नसतो. यासाठी अनेक मार्ग आहेत. आताची मुलाखत समोर आली म्हणून चर्चा होण्याची गरज नाही. याबाबत मध्यस्थी करण्याबाबत लोक आहेत.
- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते - विधान परिषद
राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू नसतो. राज आणि उद्धव हे तर दोघे भाऊ आहेत. राज अन् उद्धव एकत्र आल्यास आम्हाला काहीच फरक पडणार नाही.
- भरत गोगावले, शिंदेसेनेचे नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री
हिंदीच्या सक्तीला ठाकरेंचा विरोध
महाराष्ट्रात सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहत आहोत. त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका. आम्ही अस्सल धर्म पाळणारे, मराठी बोलणारे हिंदू आहोत. पण हिंदीची सक्ती कोणी करीत असेल तर ती आम्ही उखडून फेकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला.
भारतीय कामगार सेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुंबईत बोलताना ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. जो महाराष्ट्रात राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती होती. महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लिहिण्याचा कायदा केला. पण आताच्या सरकारने त्याची किती अंमलबजावणी केली? हिंदी व आमचे वैर नाही, सर्व जण हिंदी, मराठी बोलतात. असे असताना हिंदीची सक्ती कशासाठी केली जात आहे?