बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:55 PM2023-04-12T13:55:36+5:302023-04-12T13:56:37+5:30
मनसेने राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जो वाद झाला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - बाबरी मुद्द्यांवरून राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले त्यावरून ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे. चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजीनामा द्यावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. त्यात आता मनसेनेहीराज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे.
मनसेनेराज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जो वाद झाला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अधिकृत या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत राज ठाकरे एक प्रसंग सागतात, ते म्हणाले की, दुपारची वेळ होती, त्यावेळेला बाबरी मशिद पडली होती. दीड-दोन तासांनी एका वृत्तपत्राकडून बाळासाहेबांना फोन आला, त्यांनी म्हटलं इथं कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, परंतु भाजपाचे सुंदरलाल भंडारी असं म्हणतायेत. हे भाजपाच्या लोकांनी केलेली नाही कदाचित शिवसैनिकांनी केलेली असेल. मी तिथेच होते. त्याच क्षणाला बाळासाहेब ठाकरे म्हणाले, जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. त्यावेळी, त्याक्षणी एक जबाबदारी अंगावर घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट होती असं त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर मनसेने भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना सुनावले. अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा असं त्यांनी म्हटलं.
अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी सन्मा. राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा ! pic.twitter.com/6AwTnGRdo2
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 11, 2023
उद्धव ठाकरेंनीही फटकारलं
चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंनीही फटकारलं, उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष भंडारी यांचं विधान ऐका, तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली असं उद्धव ठाकरेंनी सांगत चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची मागणी केली.