Raj Thackeray: राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती, शिवसेनेशी युतीची चर्चा, राज ठाकरेंची मनसैनिकांचा महत्त्वाची सूचना, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:36 PM2022-08-22T13:36:58+5:302022-08-22T13:37:47+5:30
Raj Thackeray: राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूवीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांची आद मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.
मुंबई - गेल्या तीन चार महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यातून शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठं बंड होऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र या शपथविधीला दोन महिने होत आले तरी राज्यातील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. त्यातच कालपासून शिवसेना आणि मनसे युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूवीवर मनसेप्रमुखराज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांची आद मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.
आज मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ही रवींद्र नाट्य मंदिर येथे झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पाहा, अशी महत्त्वपूर्ण सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिक आणि मनसे पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवण्याचा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, ही बैठक आटोपल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नांदगावकर यांना मनसे आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत विचारले असता याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेच काय ते स्पष्ट करतील, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्या राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.