EVM विरोधात राज ठाकरेंचा पत्रप्रपंच; उद्धव ठाकरे, शरद पवारांना पत्र लिहून केले विरोध करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 01:46 PM2018-08-29T13:46:23+5:302018-08-29T13:57:41+5:30
भारतीय जनता पक्षाला मिळालेले विजय इव्हीएममुळे मिळत असल्याचा आरोप करणाऱे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई - भारतीय जनता पक्षाला मिळालेले विजय इव्हीएममुळे मिळत असल्याचा आरोप करणाऱे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून इव्हीएमला विरोध करण्याचा आवाहन केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगात सोमवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस, व मित्रपक्ष विरुद्ध भाजप यांच्यात ईव्हीएमवरून जोरदार खडाजंगी झाली होती. निवडणुका ईव्हीएमद्वारे घ्याव्यात यावर भाजप ठाम असताना काँग्रेस व मित्रपक्षांनी मतपत्रिकांच्या वापराचीच मागणी केली होती. सहा तास चाललेल्या या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुकीचे आश्वासन दिले होती.
निवडणूक आयोगाने आयोगाने राजकीय पक्षांना प्रश्नावली पाठवून, त्यावर म्हणणे मागविले होते. ईव्हीएम मशीनची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या कंपन्यांची यादी सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेस व मित्रपक्षांनी केली. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून होणारा खर्चावर बंधने आणण्याची मागणी काँग्रेसने केली. राजकीय पक्षांच्या खर्चावर मर्यादा नसल्याने अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपा पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. या खर्चावर अंकुश लागत नाही, तोपर्यंत निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, असे मत काँग्रेसने मांडले. बैठकीस सात राष्ट्रीय व ५१ प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी आले होते. काँग्रेस, सपा, बसपा, आप, सीपीएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांनी ईव्हीएमला आक्षेप घेतला. मतपत्रिकांचा वापर शक्य नसल्यास व्हीव्हीपॅट वापर वाढवून प्रक्रिया पारदर्शी करावी, असे त्यांचे म्हणणे होते. बीएसपीचे नेते सतीश मिश्राम्हणाले की, मतपत्रिकाच वापराव्यात. ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. काँग्रेस व आपचे म्हणणे होते की, व्हीव्हीपॅटच्या २० ते ३० टक्के मतांची ईव्हीएममधी मतांशी पडताळणी करावी. गडबडीचे अनेक प्रकार समोर आले असून, त्याचा फायदा केवळ भाजपलाच होत आहे. अनेक विकसित देशांनी पुन्हा मतपत्रिकांनीच निवडणुका सुरू केल्या आहेत.