"पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, ओला दुष्काळ जाहीर करा", राज ठाकरेंची राज्य सरकारकडे आग्रही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:53 PM2021-09-29T23:53:29+5:302021-09-29T23:56:43+5:30
Raj Thackeray : प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांत गुलाब चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील विविध भागांत लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकरकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. पंरतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtrapic.twitter.com/fnCIswerMO
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका - मुख्यमंत्री
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले.
नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश
सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.