बदलापूर प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंचा व्हिडिओ कॉल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 06:42 PM2024-08-21T18:42:37+5:302024-08-21T18:44:21+5:30
बदलापूरातील मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
बदलापूर - शहरातील एका शाळेत घडलेल्या घृणास्पद प्रकाराला वाचा फोडत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर असून येत्या २६ ऑगस्टला ते बदलापूर येणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरेंनी आंदोलनकर्त्या मनसे कार्यकर्त्यांना मला तुमचा अभिमान आहे असं सांगत त्यांचे कौतुक केले.
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूरातील मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत अविनाश जाधव यांनी मोबाईलवरून मनसे प्रमुख राज ठाकरेंना व्हिडिओ कॉल लावला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मला तुमचा अभिमान वाटतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. सारखे सारखे लोक येतील त्या मुलीच्या घरच्यांना भेटून छळतील. त्या मुलीला आयुष्यभराचा त्रास देतील. या मुलीचे घर आणि नाव कळणार नाही याची दक्षता घ्या. त्या मुलीच्या घरी कुणी जाणार नाही. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पोलीस अधिकाऱ्यांशी बोला. या मुलींसमोर आयुष्य पडलं आहे. बाकीचे कुणी राजकारण करतील परंतु आपल्याकडून ही गोष्ट होता कामा नये. मुलीच्या घरच्यांना आधार द्या. समजावून सांगा. मुलींना त्रास होणार नाही एवढे फक्त बघा...अशा सूचना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच माझा विदर्भ दौरा हा २५ तारखेपर्यंत संपतोय. मी २६ ऑगस्टला बदलापूरला येईन. परंतु तिथे आलो तरी मुलींच्या घरच्यांना भेटणार नाही. मला या गोष्टीमुळे तिच्या घरच्यांना कुठेही त्रास होता कामा नये ही पहिली काळजी घ्या असंही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी बदलापूरातील हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी संगीता चेंदवणकर यांनी १२ तास ठिय्या आंदोलन केले होते.
शिक्षण विभागानं केली कारवाई
बदलापूरातील त्या शाळेत झालेला प्रकार हा अतिशय घृणास्पद होता. या प्रकारात झालेली दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आमच्याकडे आला असून आमच्या विभागाच्या संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली.