Raj Thackeray: '3 तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर जशास तसं उत्तर देऊ'; राज ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:16 PM2022-04-17T12:16:04+5:302022-04-17T12:42:40+5:30
Raj Thackeray: "आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही, भोंग्याला आहे. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे."
पुणे: राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. "देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे 3 तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ," असा इशाराच त्यांनी दिला.
'भोंग्याचा त्रास मुस्लिमांनाही'
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "इथे पत्रकार परिषदेत एक मुस्लिम पत्रकार आले आहेत, ते आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितलं की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येतं की, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही होतोय."
'...तर जशाच तसं उत्तर देऊ'
"मशिदीवरील भोंग्याचा विषय मी काढला म्हणून नाही, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तुम्ही पाचवेळा नमाज लावाल, तर आम्हीही पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. आता रमजान सुरू आहे, मला रमजानच्या महिन्यात काही वाद नकोय. आम्ही 3 तारखेपर्यंत शांत राहू. त्यांना या देशातल्या कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल, तर जशाच तसं उत्तर गरजेचं आहे," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
'मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही'
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.