निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:12 PM2024-11-10T23:12:35+5:302024-11-10T23:14:24+5:30
राज ठाकरेंनी आज माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ सभा घेतली.
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज माहिम मतदारसंघात मुलगा अमित ठाकरेंसाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासोबतच दिवंगत बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय, राज ठाकरेंनी कधीच निवडणूक का लढवली नाही, याचा एक प्रसंग सांगितला.
काय म्हणाले राज ठाकरे?
जुन्या आठवणी ताज्या करत राज ठाकरे म्हणाले, 'मी सहसा जी गोष्ट कधीच करत नाही, ती मी आज केली. या सभेला येण्यासाठी मी सिग्नल तोडत आलो. आधीच निवडणूक आयोगाने कमी दिवस दिले, मुंबईमध्ये सगळीकडे पोहोचणे अवघड आहे. तेव्हा महाराष्ट्रात कसं पोहोचणार? ‘सामना’कडे येताना मला सर्व फ्लॅशबॅक येत होते. सर्व जुना काळ समोर येत होता. पहिले साप्ताहिक काढले. बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी तो मार्मिक, तो इथल्या प्रभादेवीच्या प्रेसमधून, इथूनच सामना निर्माण झाला. पहिले पाक्षिक सुरू केले त्याचे नाव होते प्रबोधन. प्रबोधनमुळे माझ्या आजोबांना प्रबोधनकार म्हणून ओळखले गेले.'
'दादरमध्ये साप्ताहिक सुरू झाले होते. मराठामध्ये बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुगमध्ये माझे वडील व्यंगचित्र करत. हे सुरू असताना पुन्हा मार्मिक सुरू झाले, मराठी माणसावर जो अन्याय होत होता, तो त्यात आला, त्यात होतं वाचा आणि थंड बसा. मात्र नंतर आले की वाचा आणि पेटून उठा. जे भाषण सुरू झाले तेव्हा त्याला स्वरूप द्यायचे की नाही, बाळासाहेब म्हणाले की द्यायचे आहे पण कल्पना नाही. त्याला नाव काय द्यायचे यावर चर्चा झाली. आजोबांनी सांगितले शिवसेना.'
'मी मार्मिकमध्ये व्यंगचित्रला सुरुवात केली. 1985 साली बाळासाहेबांनी व्यंगचित्र करणे बंद केले, त्यानंतर जबाबदारी माझ्यावर आली. लोकसत्ता, सामनामध्येदेखील माझे व्यंगचित्र चालू झाली. हे सगळे सांगायचा विचार का आला? तर याची सुरुवात केली प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली. अनेक आमदार झाले, ठाकरेंचा प्रवास दादर, प्रभादेवी, माहीममध्ये झाला.
निवडणूक का लढवत नाही?
राज ठाकरे निवडणूक का लढवत नाही? याबाबत त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे म्हणाले, '1974 सालची गोष्ट आहे. आमचे माने नावाचे वाहनचालक आले नव्हते, त्यावेळी शिवेसना भवन नव्हते. वांद्रात ब्लू पल नावाची इमारत होती, तेथील पहिल्या मजल्यावर एक छोटीशी खोली होती. तेच शिवसेनेचे ऑफिस होते. मी आणि बाळासाहेब कार्यालयात जायला निघालो. तेवढ्यात तत्कालीन महापौर सुधीर जोशी आले. त्यांची इम्पाला मोठी लाल दिव्याची गाडी होती. त्यांना बाळासाहेबांशी बोलायचे होते. त्यांचे बोलून झाल्यावर बाळासाहेब बाहेर आले. तेवढ्यात सुधीरभाऊंनी विचारले कुठे जाताय? मी सोडतो. तर बाळासाहेब म्हणाले, तुमचे दिवे तुमच्यापाशी राहुदेत. मी नाही तुमच्या दिव्याच्या गाडीत बसणार.'
'मी हे सगळं ऐकत होतो आणि मग आम्ही टॅक्सीत बसलो. टॅक्सी सुरू झाली आणि वांद्रांच्या ब्रिजवर असताना मी मागे वळून पाहिले तर टॅक्सीच्या मागे लाल दिव्याची गाडी होती. तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता, ती व्यक्ती माझ्या शेजारी बसली होती. आता मला सांगा हे चित्र ज्या मुलाने पाहिले असेल, त्याला खुर्चीचा सोस असेल का? बाळासाहेब ठाकरे किंवा माझ्या वडिलांनी कोणती गोष्ट करा अथवा करू नका, असं मला कोणीच सांगितले नाही. त्यामुळे मीही माझ्या मुलाला काही सांगत नाही. त्याला निवडणूक लढवावी वाटली, तो लढवतोय. पण निवडणुकीत उतरावे असे मला कधीच वाटत नाही. कारण, मी ज्या मुशीतून वर आलोय, त्यामुळे मला असे काही वाटत नाही,' असे राज ठाकरे म्हणाले.