Raj Thackeray: राज ठाकरेंना अटक करणार?; मविआ सरकार कारवाई करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 09:25 AM2022-05-03T09:25:17+5:302022-05-03T09:26:36+5:30
आज पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक होणार आहे.
मुंबई – मशिदीवरील भोंगे हटवावे यामागणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य केले. त्यानंतरच्या उत्तरसभेत आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी ४ मे रोजी ज्याठिकाणचे लाऊडस्पीकर हटणार नाहीत तेथील मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यावर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला आहे.
यातच राज ठाकरेंनी चिथावणीखोर विधान केले असून त्यांना अटक करावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. तसेच राज यांच्यावर कारवाईसाठी विविध संघटनांची मागणी आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यावरून आक्रमक इशारा दिला. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणची सीसीटीव्हीची तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीचा अहवाल पोलीस महासंचालक रजनी शेठ यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. यात राज ठाकरेंनी सभेला घातलेल्या अटी-शर्थींचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. आज पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
३ तारखेला ईद आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज यांनी थेट इशारा दिला होता. मशिदीतून सुरू झालेला भोंगा आताच्या आता बंद करा. नीट सांगितलेलं कळतच नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा इशाराच राज यांनी दिला. आम्ही ४ तारखेपासून अजिबात शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ती यांना दाखवावीच लागेल. देशातल्या हिंदूंना माझी विनंती आहे. ४ तारखेपासून ज्या ज्या मशिदींसमोर भोंगे दिसतील, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा आणि अनेक वर्षे जुना असलेला हा प्रश्न सोडवा, असं आवाहन राज यांनी केलं.
राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
४ मे पासून मनसेच्या आंदोलनाला सुरुवात होईल. आज रमजान ईद असल्यामुळे आणि राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेतही भोंग्यांबाबतची आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अचानक राज ठाकरेंनी काल पत्रक जारी करुन आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तसंच भोंग्यांबाबतच्या निर्णयावर आपली भूमिका आज जाहीर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी नऊ वाजता मनसेच्या महत्वाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे 'शिवतीर्थ'वर बैठक घेत आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.