राज ठाकरेंचा दूत मातोश्रीवर!
By Admin | Published: January 30, 2017 04:32 AM2017-01-30T04:32:43+5:302017-01-30T04:32:43+5:30
शिवसेना-भाजपा युतीचा काडीमोड झाल्यानंतर, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी हात पुढे केला आहे.
मुंबई : शिवसेना-भाजपा युतीचा काडीमोड झाल्यानंतर, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी हात पुढे केला आहे. तसा निरोप घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी ‘मातोश्री’ गाठली.
मुंबई महापालिकेतील २५ वर्षांपासूनची युती तुटल्यानंतर, शिवेसेना-मनसे महापालिकेत एकत्र येणार, अशी चर्चा होती. शिवाय, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतिहास घडेल, असे भाकित वर्तविले होते. मात्र, टाळीसाठी हात कोणी पुढे करायचा, हाच प्रश्न होता. शेवटी राज यांनीच युतीसाठी हात पुढे केला असून, खास दूत म्हणून माजी आमदार बाळा नांदगावकर यांना रविवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर पाठवले. नांदगावकर यांनी सेना नेते अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्याकडे राज ठाकरेंचा निरोप दिला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंशी चर्चा करून कळवतो, असे शिवसेना नेत्यांनी नांदगावकरांना सांगितले. मात्र, ‘मातोश्री’कडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. महापालिका निवडणुकीसाठी राज-उद्धव एकत्र येणार का, याकडे मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.