राज ठाकरेंचे लक्ष महाराष्ट्र ! पुण्यासह मराठवाड्याचा दौरा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:30 PM2018-07-17T13:30:12+5:302018-07-17T13:37:08+5:30
केवळ एक आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्ष संघटनेसह लोकांच्या मनातल्या जागेवरही नवनिर्माण करावं लागणार आहे.
पुणे : केवळ एक आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्ष संघटनेसह लोकांच्या मनातल्या जागेवरही नवनिर्माण करावं लागणार आहे. ही गोष्ट राज ठाकरे यांनी चांगलीच मनावर घेतली असून येत्या आठवड्यात ते पुण्यासह मराठवाड्याचा दौराही करणार आहेत.
पुणे, मुंबई आणि नाशिकचा टप्पा ओलांडत ठाकरे यांनी आता उर्वरित महाराष्ट्रात फिरण्यास सुरुवात केली आहे. आगामी २०१९च्या लोकसभा आणि विधानसभेची पावलं ओळखत त्यांनी सुरु केलेली ही वाटचाल त्यांना कितपत उपयोगी ठरेल सांगणं कठीण असलं तर सुरुवात केल्याची नोंद मात्र घ्यायला हवी. ठाकरे आज पुण्यात असणार असून उद्या ते महाराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यात सुरुवातीला ते औरंगाबादला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तिथून पुढे जालना,परभणी, बीडलाही त्यांचा दौरा असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना मदतही केली जाईल. या सगळ्यात त्यांना आळसावलेल्या आणि काहीशा ढेपाळलेल्या कार्यकर्त्यांना जागं करता येणार आहे. मागील काही दिवसांपासून पक्ष संघटनेतही बदल करण्यात आले असून जून्यांची नाराजी दूर करणेही सुरु आहे. ठाकरे स्वतःही ऍक्टिव्ह झाले असून व्यंगचित्राच्या माध्यमातून आणि विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया देत अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत.
पुण्याला मागच्याच आठवड्यात उद्धव ठाकरेंनी भेट दिली.अमित शहादेखील नुकतेच येऊन गेले आहेत . त्यानंतर येत्या शुक्रवारी गणेश कला क्रीडा मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी शहरावर चांगलेच लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. पक्षाकडून आगामी लोकसभा लढवण्यासाठी उमेदवाराचा शोध सुरु असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे. मराठवाड्यातही मनसेची स्थिती फारशी चांगली नसून ठाकरे यांनी स्वतः लक्ष देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत होती.अखेर ठाकरे यांनी पक्षाला ठराविक भागापुरते सीमित न ठेवता राज्यात पोचवण्याचे मनावर घेतल्याचे दिसत असून याचा कितपत उपयोग होईल याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेल.