राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटला २१ ऑगस्टचा मुहूर्त
By admin | Published: August 14, 2014 11:10 AM2014-08-14T11:10:59+5:302014-08-14T11:43:19+5:30
राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित ब्लू प्रिंटला अखेर मुहूर्त सापडला आहे. २१ ऑगस्ट रोजी राज ठाकरे हे राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करणार आहेत.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १४ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित ब्लू प्रिंटला अखेर मुहूर्त सापडला आहे. २१ ऑगस्ट रोजी राज ठाकरे हे राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करणार असून या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या पाच वर्षांपासून मनसेअध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडू असे वारंवार सांगत होते. मात्र ही ब्लू प्रिंट कधीच जाहीर केली जात नव्हती. त्यामुळे राज ठाकरेंची ब्लू प्रिंट कधी येणार असा सवाल नेहमीच उपस्थित व्हायचा. लोकसभेचे निकाल जाहीर होताच शिवसेनेने विकास आराखडा मांडून मनसेवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या अपयशानंतर राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी कामाला लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर राज ठाकरे त्यांची विकासाची ब्लू प्रिंट २१ ऑगस्ट रोजी सादर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या ब्लू प्रिंटमध्ये रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य, ग्रामविकास, महिला सुरक्षा, शिक्षण, कृषी आणि आर्थिक विकास अशा नऊ मुद्द्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनसेच्या या ब्लू प्रिंटच्या प्रकाशन सोहळ्यास रतन टाटा, मुकेश अंबानी हे उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे समजते.