मनसेच्या गुढीपाडव्याला राज ठाकरेंचा परदेश दौरा आडवा
By Admin | Published: March 20, 2017 01:35 PM2017-03-20T13:35:33+5:302017-03-20T17:38:45+5:30
यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसांच्या नववर्षाचा सण. मराठ्यांचं नववर्ष ख-या अर्थानं गुढीपाडव्यालाच सुरू होतं. आनंद, उत्साह, जल्लोष आणि नव्या संकल्पाची सांगड घालत हा सण अनेकांच्या घरी साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी राजकीय पक्षांकडून अनेक मेळावेही घेण्यात येतात. महाराष्ट्रात सर्वाधिक मेळावे मनसे आणि शिवसेना या पक्षांचे असतात.
मात्र यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणारा मेळावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवसांत राज ठाकरे परदेश दौ-यावर जाणार असल्यानं हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच राजकीय पक्षांच्या मेळाव्यालाही मोठ्या संख्येनं लोकांची उपस्थिती असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रेत मराठ्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडत असतं. तरुणांच्या सळसळत्या उत्साहामुळे या शोभायात्रांना एक वेगळाच रंग चढतो. मात्र यंदा राज ठाकरेंच्या मनसेनं शोभायात्रा न काढण्याचं ठरवल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीत मनसेच्या झालेल्या दारुण पराभवामुळे ही शोभायात्रा काढण्यात येणार नसल्याची शक्यता आहे.