सारखी पिरपिर नको, कारखान्यांना नीट गिळू दे आधी; राज ठाकरेंचा पुन्हा 'व्यंग'वार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 08:48 PM2018-11-18T20:48:07+5:302018-11-18T20:49:04+5:30
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रांमधून ताशेरे ओढत आहेत.
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रांमधून ताशेरे ओढत आहेत. राज्यात दुष्काळ असताना सरकार साखर कारखान्यांना 550 कोटी रुपये मदत देणार असल्याच्या वृत्तावर त्यांनी व्यंगचित्रातून टीका केली आहे.
तहाणलेला महाराष्ट्र पाणी मागत आहे आणि आपल्या राज्याचे संवेदनशील महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेल्या साखर कारखान्यांना कोट्यवधींची मदत करत आहे. यावरून सारखे पाणी दे, पाणी दे म्हणणाऱ्या जनतेला सरकार कसे गप्प बसवत आहे, याची मार्मिक व्यंग राज ठाकरे यांनी साकारले आहे.
दैनंदिन वापरासाठी, जगण्यासाठी पाण्याची मागणी करणाऱ्या जनतेपेक्षा राज्य सरकारला ऊस आणि साखर कारखाने महत्वाचे वाटत आहेत. यामुळे सारखी पाण्याची मागणी करणाऱ्या जनतेला उद्देशून सरकार जनतेला कोपऱ्यात बसण्यासाठी दटावत आहे. ' वा...! जा बघू , तिथे कोपऱ्यात जाऊन बस! साऱखी आपली पिरपिर पिरपिर, पाणी द्या पाणी द्या ! याला जरा शांतपणे गिळू देशील की नाही!' असे सांगत साखर कारखान्यांमधील भ्रष्टाचाराला सरकार कसे खतपाणी घालतेय यावरही प्रकाश टाकला आहे.