राज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 09:56 PM2018-10-23T21:56:23+5:302018-10-23T21:57:10+5:30
लोकसभा निवडणुकांना काही महिनेच उरले असून त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचेही पडघम वाजणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी
मुंबई - आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवातच झाल्याचे दिसत आहे. कारण, सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून आघाडींबाबत बैठका सुरू आहेत. त्यातच, भाजपानेही शिवसेनेला युतीसंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे बजावल्याचे वृत्त होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबतही बैठका सुरू आहेत. आता, मनसेनेही आपल्या उमेदवारींच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. मनसेकडून ज्या मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मतदान मिळाले, अशा 40 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे.
लोकसभा निवडणुकांना काही महिनेच उरले असून त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचेही पडघम वाजणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही राज ठाकरेंच्या मनसेचा चांगलाचा प्रभाव जाणवणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असल्याचे समजते. दरम्यान, राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी अन् शिवसेनेवर होणारी टीका आणि शरद पवारांसोबत वाढणारी जवळीक लक्षात घेता मनसेही आघाडीत जाण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, याबाबत काँग्रेसची अद्यापही चुप्पीच आहे. मात्र, मनसेने आघाडीत प्रवेश केल्यास याचा फायदा निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होईल. या जागांवरील आघाडीचे उमेदवार निवडणूक आणण्यात मनसेची भूमिका महत्त्वाची ठरेल.
दरम्यान, मुंबईतील काही मतदारसंघात मनसेचं स्थान भक्कम आहे. तसेच ठाणे, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातील काही मतदारसंघात मनसे जोमाने उतरणार आहे. तर, राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेऊनच भाजपाचा विजयीरथ रोखण्याचा आघाडीचा प्रयत्न राहणार आहे.