‘लोकमत’मधील खुल्या पत्राला राज ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:37 AM2017-11-19T00:37:59+5:302017-11-19T00:41:07+5:30
डॉक्टरांविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका... या डॉक्टरांना धमकावणाºया बॅनर्सविषयीच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खुल्या पत्राची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: दखल घेतली व फोन करून याविषयी सविस्तर चर्चा केली.
- डॉ. अमोल अन्नदाते
डॉक्टरांविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका... या डॉक्टरांना धमकावणाºया बॅनर्सविषयीच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खुल्या पत्राची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: दखल घेतली व फोन करून याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच नंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला त्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले आणि तासभर या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्याबद्दल राज ठाकरे यांचे हार्दिक आभार.
या चर्चेत राज ठाकरे यांनी सांगितले की, डॉक्टरांविरुद्ध असे प्रकार घडत असतील व डॉक्टरांना त्याचा मानसिक त्रास होत असेल तर ते चुकीचे आहे. बºयाचदा स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते असे काही उपक्रम राबवत असतात, पण आपल्यापर्यंत त्याची माहिती लवकर व नीट पोहोचत नाही म्हणून आपण हे मांडले व या सूचनांचे स्वागत आहे. तसेच हे बोर्ड काढले जातील व कुठल्याही डॉक्टरला त्रास झाल्यास मला कळवावे. त्याचा सोक्षमोक्ष मी तातडीने लावेन, असेही त्यांनी सांगितले.
बºयाचदा रुग्ण व त्यांचे नातेवाईक मानसिकदृष्ट्या खचलेले असतात म्हणून त्यांना डॉक्टरांनी सांभाळून घ्यावे. डॉक्टर हे देवानंतर असतात, देवाला चूक मान्य असते का? तशीच डॉक्टरला ही चूक मान्य नाही. एक वेळ उपचाराला प्रतिसाद मिळणे समजू शकतो, पण वागण्यात डॉक्टरांनी चुकू नये, अशी जनतेची अपेक्षा असते. रुग्णांच्या तक्रारी आणि त्यांना मदतीसाठी आज कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नाही. डॉक्टरांनीच एकत्र येऊन असे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असेही राज ठाकरे म्हणाले.
आपण विधायक पद्धतीने रुग्णहिताच्या बाजूने लढणार असाल तर सर्व डॉक्टर आपल्या पाठीशी उभे आहेत, अशी मी राज ठाकरे यांना हमी दिली. त्यावर राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या कार्यात डॉक्टरांना सोबत घेऊन डॉक्टरांच्याच पुढाकाराने रुग्णांच्या प्रश्नांसाठी एखादी हेल्पलाइन, सोशल मीडियाचे व्यासपीठ उभे करण्याविषयीही राज ठाकरे यांनी सूचना केली. तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करण्याविषयीच्या अजून कोणत्या योजना असू शकतात याविषयीची माहितीही त्यांनी जाणून घेतली.