"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:22 PM2024-11-06T15:22:04+5:302024-11-06T15:25:40+5:30
Raj Thackeray Manoj Jarange Maharashtra Election 2024: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंना सवाल केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावले.
Raj Thakeray Latest News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण मिळू शकत नाही, असे स्पष्ट भूमिका मांडली. सर्व राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत. ते तुमच्याकडे आले तर त्यांना विचारा की आरक्षण कसं देणार हे आधी सांगा, असे आवाहन राज ठाकरेंनी मराठा समाजाला केले.
मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला. मराठा आरक्षण मिळू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.
राज ठाकरे मराठा आरक्षणाबद्दल काय बोलले?
राज ठाकरे म्हणाले, "जिल्ह्याजिल्ह्यांत मोर्चे निघाले होते, त्या मोर्च्यांचं काय झालं? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा", असा सवाल राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना केला.
"ही सत्य परिस्थिती जरांगेंसमोरही मांडली होती"
"बाबानों, मी या गोष्टी तुमच्याशी बोलतोय, या अत्यंत विचारपूर्वक बोलतोय. हे तु्म्हाला फक्त झुलवताहेत. हे राजकीय पक्ष जे आहेत, ते तुम्हाला झुलवताहेत. फक्त भूलथापा देताहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडतोय. हीच सत्य परिस्थिती मी ज्यावेळी जरांगे पाटलांना भेटायला गेलो, त्यावेळी मी त्यांच्यासमोर मांडली होती", असे राज ठाकरे म्हणाले.
तुमच्या हातात तरी आहे का ते? ठाकरेंचा शिंदेंना सवाल
"हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला माहिती आहे. जे जे तुम्हाला येऊन सांगताहेत ना की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आले की पहिल्यांदा विचारा कसं? मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं जा, दिलं आरक्षण! म्हणजे काय? तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का? कोणतंही राज्य सरकार देऊ शकतं का? तामिळनाडूत असा प्रकार झाला. तामिळनाडू सरकारने सांगितलं आरक्षण दिलं. तो विषय सर्वोच्च न्यायालयात पडलेला आहे. त्याचा काहीही निकाल लागलेला नाही. जी गोष्ट घडू शकत नाही. जी गोष्ट होऊ शकत नाही, त्यावर आपण भांडतो आहोत", असे राज ठाकरे म्हणाले.