राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 21:55 IST2024-04-09T21:55:13+5:302024-04-09T21:55:44+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मंबई- आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये गुढा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानले.
# Live📡| 09-04-2024 📍 नागपूर
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2024
🎥 पत्रकारांशी संवाद https://t.co/NAlFbF8GSV
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पाठिंबा देताना त्यांनी कुठलीही अट ठेवली नाही. आज देशात नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर विकास करत आहेत. मोदींच्या नेतृत्वासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, राज ठाकरेंनी विधानसभेची तयारी करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. यावर शिंदे म्हणाले, राज ठाकरे यांचा एक पक्ष आहे. प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.
फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेबाबतही सूचक घोषणा
पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात अनेक सभा होणार आहेत. त्याचे महाराष्ट्र वर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील ट्विट करुन राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले. सस्नेह स्वागत ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.