उत्तर सभेत राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींकडे दोन मागण्या, एक समान नागरी कायदा अन् दुसरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:43 PM2022-04-12T20:43:24+5:302022-04-12T20:43:37+5:30
समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण...
ठाणे - मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर आज राज ठाकरे यांची तोफ ठाण्यात धडाडली. राज यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचे पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्या त्या भाषणानंतर राज्यातील काही पक्षांतील नेत्यांच्याही विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांना उत्तर म्हणून, आज राज ठारे यांनी ही उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे, समान नागरी कायदा करावा आणि देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा काही कायदा करावा, अशा दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण या लोकसंख्येने एकदिवस देश फुटेल. यामुळे या गोष्टी होणे आवश्यक आहे.
राज म्हणाले, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला, असे बोलतात, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला हा गैरसमज, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. तेव्हा ज्या गोष्टींसाठी मला विरोध करायचा होता, तेव्हा मी पंतप्रधान मोदींना विरोध केला. गरज पडली तर पुन्हा करीन. पण कलम 370 रद्द केल्यानंतर, अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझेच होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा पहिला माणूस मीच होतो. त्यानंतर बाकी लोक बोलले, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
नोटीशीसंदर्भात काय म्हणाले राज -
आय एल अँड एफ एस नावाची कंपनी होती, मी त्यात होतो. नंतर ते झेपायचे नाही म्हणून एका वर्षात त्यातून बाहेर पडलो. त्या कंपनीसंदर्भातील ती नोटीस होती. ती नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवारांना येतेय म्हणून चाहूल लागली, तर एवढे नाटक केले. हाताने जर पाप केले नाही तर नोटीसा राजकीय असो अथवा कायदेशीर मी भीक घालत नाही." असेही राज यावेळी म्हणाले. त्यामुळे मला उद्या एखादी गोष्ट नाही पटली, तर मी परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिले म्हणून, टीका करायची, असे करणार नाही. तसेच आता तुम्ही शेण खाल्ले आहे, यामुळे आता तुमच्यावर टीका करणार, असहे राज यांनी रोखठोक शब्दांत सांगितले.