"जो भाऊ तुमच्यासोबत लहानाचा मोठा झाला..."; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 07:39 AM2023-12-19T07:39:55+5:302023-12-19T07:40:49+5:30
शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार मानलेत त्यावर शर्मिला ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली
मुंबई - आभार मानायची वेळ मला आयुष्यात उद्धव ठाकरेंनी कधीच दिली नाही.किणी प्रकरणापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात. निदान जो भाऊ तुमच्यासोबत लहानापासून मोठा झाला. त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असता ना तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. जी आता त्यांच्यावर आलीय अशा शब्दात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार मानलेत त्यावर शर्मिला ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला. तो असे करेल मला वाटत नाही. परंतु तुम्ही ज्या भावासोबत मोठे झालात परंतु किणी प्रकरणावेळी मदत का केली नाही? किणी प्रकरणावरून आजपर्यंत टोमणे देणे कधी थांबवलं आहे? सतत टोमणे देत राहतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्हीदेखील आभार मानू असं त्यांनी म्हटलं.
तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला कुणी अडवलं होतं?
अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचे हात कुणी धरले होते का? कोविड काही महिन्यांनी सुरू झाला. धारावीचा विकास सरकारनं करावा असं तुम्हाला वाटत होते मग तुम्ही निर्णय घ्यायला हवा होता.तुम्हाला कुणी अडवले होते? कोणतेही चांगले निर्णय घ्यायला तुम्हाला कुणी थांबवले होते? राज्यात मराठ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज जे विरोधी पक्षात असतील किंवा सर्वच पक्ष असतील मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणतायेत मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला कुणी अडवलं होते, मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.
दरम्यान,सर्व गोष्टीला कोविडचे कारण दिलं जाते, परंतु कोविड काही महिन्यांनी सुरू झाला. मराठ्यांचे आंदोलन हे वर्षानुवर्षे सुरू आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचे होते मग तेव्हा द्यायचे होते. तुम्ही विधानसभेत विधेयक पास करायचे होते. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तुम्ही बहुमतात सरकारमध्ये होता मग तेव्हा आरक्षण देऊन टाकायचे होते. धारावीचा विकास सरकारला करायचा होता मग करून टाकायचा. कुणी तुमचे हात धरले होते? आपल्याकडे टाटांसारखे अनेक ब्राँड आहेत. धारावीच्या विकासाचे टेंडर काढून त्यात जो कुणी चांगला आहे त्याला काम द्यायला हवे होते असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.