राजनविषयी सीबीआय अंधारात

By admin | Published: November 10, 2015 02:34 AM2015-11-10T02:34:27+5:302015-11-10T02:34:27+5:30

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंधित गुन्ह्यांची सर्व प्रकरणे सीबीआयकडे सुपुर्द करण्याची घोषणा करून चार दिवस उलटले असले तरी सीबीआयला मात्र अद्याप

Rajan CBI CBI in darkness | राजनविषयी सीबीआय अंधारात

राजनविषयी सीबीआय अंधारात

Next

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंधित गुन्ह्यांची सर्व प्रकरणे सीबीआयकडे सुपुर्द करण्याची घोषणा करून चार दिवस उलटले असले तरी सीबीआयला मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारकडून यासंदर्भात कोणतीही सूचना मिळालेली नाही. एक-दोन दिवसांत सीबीआयला याबाबत सूचित केले जाईल. आठवडाअखेरच्या सुटीने या कामी दिरंगाई झाल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.
बनावट पासपोर्ट प्रकरणात छोटा राजन सीबआयच्या ताब्यात आहे. बाली येथून त्याची भारतात रवानगी करण्यात आली, त्याच दिवशी अतिरिक्त मुख्य गृहसचिव के. पी. बक्षी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारने छोटा राजनशी संबंधित गुन्ह्यांची सर्व ६९ प्रकरणे सीबीआयकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती. छोटा राजनविरुद्ध महाराष्ट्रात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपास करायचा काय, या संदर्भात आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे सूचित करण्यात आलेले नाही. एकीकडे तातडीने घोषणा करण्यात येऊनही त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात तत्परता दाखविण्यात आलेली नाही. दुसरीकडे गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने वाद ओढवून घेण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळेच छोटा राजनच्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आला, अशी आयपीएस अधिकाऱ्यांच्या गोटात दबक्या आवाजात चर्चा आहे.
बोटाच्या ठशांमुळे राजन भारताच्या ताब्यात
मुंबई : कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला इंडोनेशियाकडून भारताच्या ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ३५ वर्षांपूर्वी घेतलेले त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे ओळख पटविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. टिळकनगर पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेली ‘त्या’ मूळ प्रतींची शहानिशा केल्यानंतर राजनला भारताकडे सुपुर्द करण्यात आले अन्यथा राजनची ओळख पटविण्यासाठी त्याची डीएनए टेस्ट घ्यावी लागली असती.
पोलिसांनी ३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या राजनच्या हाताच्या ठशांच्या कागदाच्या प्रती १० वर्षांपूर्वीच्या झालेल्या अतिवृष्टीवेळी भिजल्या होत्या. त्यात या कागदांचे तीन तुकडे झाले होते. मात्र पोलिसांनी ते जुळवून स्कॅन करून पाठविले. इंडोनेशिया दूतावासाने या पुराव्याच्या आधारावर राजनचा ताबा भारताकडे दिल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
छोटा राजनला ताब्यात घेण्यासंदर्भात त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांची माहिती व त्यासंबंधी अन्य पुरावे घेऊन क्राइम ब्रँचमधील दोन अधिकारी ३० आॅक्टोबरला दिल्लीला गेले होते. त्यावेळी पकडला गेलेला इसम हा छोटा राजनच आहे, हे पटवून देण्यासाठी त्याच्या अटकेवेळी काढण्यात आलेल्या फिंगर प्रिंटची झेरॉक्स कॉपी होती. मात्र त्याची मूळ प्रत पाहिल्याशिवाय इंडोनेशियाकडून त्याचा ताबा मिळणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
फिंगर प्रिंट्सचा आठवडाभर शोध
एका वॉचमनची हत्या व पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छोटा राजनला टिळकनगर पोलिसांनी १९८० मध्ये अटक केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी याच पोलिसांनी अजून एका हत्येप्रकरणी पुन्हा त्याला अटक केली होती. त्या वेळी हाताचे ठसे घेतले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनंतर तो गेल्या २५ आॅक्टोबरला इंडोनेशियात सापडला.
मात्र आपण मोहनकुमार असल्याचे तो सांगत असल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी फिंगर प्रिंट्सची मूळ कॉपी शोधण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. त्यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे पथक तब्बल आठवडाभर पोलीस ठाण्याच्या ‘रेकॉर्ड रूम’मधील हजारो कागदपत्रे तपासत होते. अखेर राजनच्या हातांच्या ठशांचे कागद तीन तुकड्यांमध्ये आढळले. फिंगर प्रिंट्सबरोबरच राजनच्या जन्मतारखेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना त्याच्या शाळेतून जन्म दाखल्याची प्रत मिळवावी लागली. अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीला रवाना होण्यासाठी विमानतळावर पोचले असताना पोलिसांनी जन्म दाखल्याची प्रत त्यांच्याकडे दिली.

Web Title: Rajan CBI CBI in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.