राजनवर आरोपपत्र दाखल करा

By Admin | Published: July 26, 2016 01:05 AM2016-07-26T01:05:23+5:302016-07-26T01:05:23+5:30

जे. डे हत्याप्रकरणी छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यास वारंवार मुदतवाढ मागून घेणाऱ्या सीबीआयची सोमवारी विशेष न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली. विशेष न्यायालयाने

Rajan file chargesheet | राजनवर आरोपपत्र दाखल करा

राजनवर आरोपपत्र दाखल करा

googlenewsNext

मुंबई : जे. डे हत्याप्रकरणी छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यास वारंवार मुदतवाढ मागून घेणाऱ्या सीबीआयची सोमवारी विशेष न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली. विशेष न्यायालयाने सीबीआयला छोटा राजनवर ५ आॅगस्टपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत सीबीआयने आरोपपत्र दाखल न केल्यास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे आरोपनिश्चित करू, अशी तंबीही विशेष न्यायालयाने सीबीआयला दिली.
सोमवारच्या सुनावणीत सीबीआयचे वकील भरत बदामी यांनी विशेष न्यायालयाला सांगितले की, सीबीआयला फरारी आरोपी नयन सिंग बिश्तविरुद्ध पुरावे हाती लागले असून ते ही आरोपपत्राला जोडायचे आहेत. त्यामुळे छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत द्यावी. सीबीआय आरोपपत्र दाखल करण्यासाठी विलंब करत आहे, हे लक्षात येताच विशेष न्यायालयाने सीबीआयला फैलावर घेत आरोपपत्र दाखल करण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली.
‘५ आॅगस्टपर्यंत आरोपपत्र दाखल करा, अन्यथा मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे आरोपीवर (छोटा राजन) आरोप निश्चित करू,’ अशी तंबीही विशेष न्यायालयाने सीबीआयला दिली. गेल्यावर्षी २५ आॅक्टोबरला छोटा राजनला इंडोनेशियातील बाली विमानतळावरून अटक करण्यात आली. छोटया राजनवर एकट्या महाराष्ट्रातून ७० केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. या सर्व केसेस राज्य सरकारने सीबीआयकडे वर्ग केल्या आहेत. तपासयंत्रणेच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पत्रकार डे यांनी लिहीलेल्या लेखामुळे छोटा राजन अस्वस्थ होता. (प्रतिनिधी)

आरोपपत्रासाठी ५ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत
११ जून २०११ रोजी छोटा राजनच्या गुंडांनी डे यांची हत्या त्यांच्या पवई येथील घराजवळ केली. याप्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने २०११ मध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सतीश कालिया, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगवाने, विनोद असरानी, पॉल्सन जोसेफ आणि दिपक जिजोदिया यांचे नाव आरोपपत्रात आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Rajan file chargesheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.