छोटा राजनची अटक ही ‘सेटिंग’
By admin | Published: October 27, 2015 01:51 AM2015-10-27T01:51:52+5:302015-10-27T02:41:08+5:30
छोटा राजनला इंडोनेशियात झालेली अटक ही निव्वळ सेटिंग असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम.एन. सिंग यांनी केला आहे. राजनची उपयुक्तता संपली आहे
मुंबई : छोटा राजनला इंडोनेशियात झालेली अटक ही निव्वळ सेटिंग असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम.एन. सिंग यांनी केला आहे. राजनची उपयुक्तता संपली आहे, त्यातच अनेक आजारांनी त्रस्त असलेला राजन भारतातल्या तुरुंगात अधिक सुरक्षित राहील, त्यामुळेच राजनने स्वत:ला अटक करवून सुरक्षित करून घेतल्याची शक्यता नाकारता
येत नसल्याचेही सिंग यांचे म्हणणे आहे.
छोटा राजनला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्याची गरज आहे. राजन गँग आता पूर्वीसारखी उरलेली नाही, ती कमकुवत झालेली आहे. खुद्द छोटा राजनही आजारी आहे. मात्र, तो अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. त्यामुळे त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. राजनला पकडून आणल्याने इतर गँगवर दहशत बसेल, असेही एम. एन. सिंग यांनी म्हटले आहे.
राजनचा वापर करून यंत्रणा दाऊदला पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, तो हाती लागत नसल्याने राजनला अटक केल्याचे सिंग म्हणाले. वय झाल्यामुळे त्याने भारतातील तुरुंगात सुरक्षित राहण्याचा विचार केला असावा, असेही सिंग यांचे म्हणणे
आहे. (प्रतिनिधी)
आतापर्यंतचे प्रमुख गुन्हे
‘टाडा’ अॅक्टखाली १९९२मध्ये भांडुपमध्ये १, १९९३-९४मध्ये टिळकनगरमध्ये १ आणि गुन्हे शाखा कक्ष ६मध्ये १ अशा गुन्ह्यांची नोंद छोटा राजनवर आहे, तर २००४मध्ये गुन्हे शाखा कक्ष ११द्वारे दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोटा) त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. आजारांमुळे निष्क्रिय : ५५ वर्षांचा छोटा राजन हा अनेक आजारांनी त्रस्त आहे. मधुमेह व किडनीच्या विकारामुळे त्याच्यावर वारंवार डायलेसिस करावे लागते. आजारामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो गुन्हेगारी कारवायांमध्ये फारसा सक्रिय नव्हता. केवळ अस्तित्व दाखवून देण्यासाठी अधूनमधून एखाद्या वृत्तवाहिनी, वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी संवाद साधून, तो मुलाखती देत असे.
1988
पासून मोस्ट वॉन्टेड असलेला छोटा राजन १९८८पासून देशातून फरार आहे. १९९५मध्ये ‘मोस्ट वान्टेड’ म्हणून राजनला घोषित करण्यात आले. गेल्या दोन दशकांपासून इंटरपोलला हुलकावणी देणारा राजन अखेर हाती लागला आहे. मुंबईतील कामगार नेते दत्ता सामंत, ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ ‘जेडे’ आणि शेट्टी यांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
198०
मध्ये राजनवर पहिला गुन्हा दाखल झाला. मूळचा फलटण जिल्ह्यातील गिरवी गावचा राजेंद्र निकाळचे उर्फ छोटा राजन उर्फ ‘नाना’ ८०च्या दशकात सहकार सिनेमाबाहेर ब्लॅकमध्ये तिकीट विक्रीचा धंदा करायचा. त्यानंतर छोटे-मोठे गुन्हे करताना राजेंद्र मोठा राजनच्या संपर्कात आला. मोठा राजन दाऊद टोळीचा सदस्य होता. १९८०मध्ये टिळकनगर परिसरात त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा पहिला गुन्हा दाखल झाला.
मुंबई पोलिसांनी मांडली गुन्ह्यांची ‘कुंडली’
मनीषा म्हात्रे, मुंबई
कुख्यात गँगस्टर छोटा राजनवर मुंबईत १९८०पासून तब्बल ६८ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांच्या दफ्तरी असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली. खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्रसाठ्यासह अनेक गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. अटकेनंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या गुन्ह्यांची कुंडलीच मांडली आहे.
हस्तांतर झाल्यास त्यानंतरच्या कारवाईसाठी गुन्हे शाखेने विशेष टीम तयार करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. १९८०पासून खंडणीच्या विविध गुन्ह्यांची नोंद छोटा राजनवर होत गेली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा उजवा हात म्हणून छोटा राजनची गुन्हेगारी विश्वात ओळख होती, मात्र १९९३च्या साखळी स्फोटांनंतर दाऊद आणि राजन यांच्यातील वाद विकोपाला गेले. स्फोट घडवणाऱ्या आरोपींची हत्या केल्याचा आरोपही छोटा राजनवर आहे. त्यानंतर राजनने मुंबईत स्वत:ची दहशत निर्माण करण्याची धडपड सुरू केली. तो खंडणी उकळू लागला. हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद झाली. ठाणे, नवी मुंबई, बंगळुरूसह विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. राजनच्या अटकेचे वृत्त धडकताच मुंबई पोलिसांनी विशेष टीम बनविणे सुरू केल्याचे गुन्हे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राजनचा ताबा मिळविण्यासाठी हा संपूर्ण डाटा सीबीआयकडे तातडीने पाठवण्यात आला आहे. राजनला भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय पाठिंब्याची गरज असल्याने त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.