समाजसेवा विभागात राजाराम भापकर गुरुजी ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

By Admin | Published: April 11, 2017 09:14 PM2017-04-11T21:14:59+5:302017-04-11T22:13:21+5:30

‘महाराष्ट्राचा मांझी’ अशी ओळख असलेले अहमदनगरचे राजाराम भापकर गुरुजी यांना यंदाचा लोकसेवा-समाजसेवा विभागातील "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.

Rajaram Bhapkar became the teacher in the social service department "Lokmat Maharashtrian of the Year" | समाजसेवा विभागात राजाराम भापकर गुरुजी ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

समाजसेवा विभागात राजाराम भापकर गुरुजी ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - ‘महाराष्ट्राचा मांझी’ अशी ओळख असलेले अहमदनगरचे राजाराम भापकर गुरुजी यांना यंदाचा लोकसेवा-समाजसेवा विभागातील "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
 
लोकसेवा-समाजसेवा विभागात युसूफ मेहरअली सेंटर, व्हाईट आर्मी, सुनील देशपांडे, डॉ. निखिल दातार यांना नामांकने जाहीर झाली होती. मात्र राजाराम भापकर गुरुजींनी बाजी मारली. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. 
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
(आयुष्यातलं पहिलं ट्विट सुषमा स्वराजांमुळे यशस्वी झालं - डॉ लकडावाला)
(डॉ. लकडावालांनी अशारितीने इमानला उपचारांसाठी आणले भारतात)
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 
 
राजाराम भापकर गुरुजी यांची माहिती
राजाराम भापकर हे अहमदनगरमध्ये भापकर गुरुजी नावानेच ओळखले जातात, पण त्यांची खरी ओळख आहे ‘महाराष्ट्राचा मांझी’ म्हणून. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना, आपल्या गावातील रस्त्याची अडचण त्यांनी ओळखली. राज्य सरकारकडे मागणी करूनही रस्ता मंजूर झाला नाही. त्यामुळे नगर तालुक्यात गुंडेगाव परिसरात त्यांनी स्वखर्चाने डोंगरमाथ्यावर २६ किलोमीटरचे रस्ते तयार केले. त्यांनी गेल्या ५७ वर्षांत सुमारे ४0 किलोमीटरचे रस्ते स्वत:च्या खर्चाने बांधले आहेत. त्यासाठी तब्बल ७ डोंगरांतून खणून वाट तयार करावी लागली. कोळेगावच्या शाळेत ते शिकवत, तेव्हा विद्यार्थ्यांना डोंगर पार करून शाळेत यावे लागे. त्यामुळे विद्यार्थीही शाळेत यायला टाळाटाळ करीत. कोळेगाव ते देऊळगाव हे अंतर तेव्हा २९ किलोमीटर होते, पण भापकर गुरुजींनी रस्ते बांधल्यामुळे ते आता १0 किलोमीटर झाले आहे. स्वत:च्या नोकरीतील पेन्शन विक्री, ग्रॅच्युएटी, भविष्य निर्वाह निधी अशी यातील निम्मी रक्कम त्यांनी केवळ या रस्त्याच्या बांधणीसाठी खर्च केली. सरकारकडून एकही पै घेतली नाही. त्यांनी तयार केलेल्या या रस्त्यावर गत १ डिसेंबरला ‘गुंडेगाव-पुणे’ ही पहिली एस.टी. बस धावली. भापकर हे आज ८५ वर्षांचे आहेत. मात्र, या वयातही ते सामाजिक कामांसाठी पाठपुरावा करत आहेत. पायजमा, सदरा आणि गांधी टोपी अशा वेशातील भापकर गुरुजी आजही सक्रिय आहेत. बिहारमधील दशरथ मांझी या मजुराने २२ वर्षांत ११0 किलोमीटरचे रस्ते स्वखर्चाने बांधले. त्यामुळे त्याच्या गावापासून गया हे अंतर ५५ किलोमीटरवरून १५ किलोमीटरवर आले. भापकर गुरुजींनी काम सुरू केले, तेव्हा त्यांना कदाचित दशरथ मांझी हे नाव माहीतही नसेल, पण तेही आता महाराष्ट्राचे मांझी ठरले आहेत. संपूर्ण भारतात भापकर गुरुजींच्या कामाची दखल घेतली गेली, परदेशी नियतकालिकांनीही त्यांच्या कामाचा गौरव केला, पण महाराष्ट्राला मात्र, आजतागायत त्यांच्या कार्याची ओळख झालेली नाही. समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम शिक्षक असतो, याची प्रचिती देणारी प्रेरणादायी कहाणी भापकर गुरुजींनी आपल्या घामाच्या शाईने लिहून ठेवली आहे.
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 
lmoty.lokmat.com

 

Web Title: Rajaram Bhapkar became the teacher in the social service department "Lokmat Maharashtrian of the Year"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.