जयसिंगरावांमुळे राजर्षी शाहू जगभर
By admin | Published: January 28, 2017 11:02 PM2017-01-28T23:02:32+5:302017-01-28T23:02:32+5:30
पवार यांच्या अमृतमहोत्सवी शानदार सत्कार समारंभात शरद पवार यांचे गौरवोद्गार
कोल्हापूर : ज्याच्या हातात लेखणी असते तो इतिहास आपल्या विचारधारेने लिहितो, अशा विचारांतून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे चरित्रदेखील चुकीच्या पद्धतीने मांडले गेले होते. मात्र, डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या संशोधनातून त्यांच्या कार्याचे वास्तव आणि सत्य पुराव्यांनिशी जगासमोर आणले. त्यांच्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य जगभरात पोहोचले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे काढले.
केशवराव भोसले नाट्यगृहात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य होते. व्यासपीठावर श्रीमंत शाहू महाराज, महापौर हसिना फरास, वसुधा पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, विशाखा खैरे, प्राचार्य टी. एस. पाटील उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री पवार यांच्या हस्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचा कोल्हापुरी फेटा, घोंगडी, पुष्पहार, गौरवपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांना महापौर हसिना फरास यांच्या हस्ते शाल, साडी, ओटी, आहेर, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.
शरद पवार म्हणाले, ‘इतिहास लिहिण्याची जबाबदारी असलेल्यांनी आपल्या ग्रंथांतून छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमद्वेषी दाखविले, संभाजी महाराज स्त्री लंपट आणि व्यसनी असल्याचे मांडले, दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांचे गुरूपद देण्याचा प्रयत्न केला. इतिहासातील अनेक व्यक्ती कर्तृत्ववान असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. करवीर संस्थान पेशव्यांच्या कचाट्यातून वाचविलेल्या महाराणी जिजाबार्इंची दखल घेतली नाही. ताराबार्इंचे शौर्य मांडले नाही. मात्र, डॉ. पवारांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून खरा इतिहास समाजासमोर आणला. समाजाला दिशा देण्याचे काम केलेल्या आणि आजच्या प्रशासकांसमोर आदर्श निर्माण राज्यकर्त्यांच्या वास्तवतेचे चित्र मांडण्याचे काम केले. त्यांच्या ग्रंथांमुळे राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले उत्तर भारतात सर्वत्र पोहोचले.’
भाई वैद्य म्हणाले, ‘इतिहास शास्त्र आता धोक्यात आले आहे. आर्य बाहेरून आले नाहीत, आदिवासी वनवासी आहे, अशा भूमिका घेऊन इतिहासात ढवळाढवळ केली जात आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चनांबद्दल द्वेष निर्माण करून त्यांना हिंदू राष्ट्राची स्थापना करायची आहे. इतिहासावर आक्रमण करून देशाचे वाटोळे करायचे आहे, अशी आक्रमणे परतवून इतिहास यथातथ्य मांडण्याची आणि भारताची बहुसांस्कृतिकता मांडून ती टिकविण्याची गरज आहे. त्यामुळे डॉ. जयसिंगराव पवार यांचे छत्रपती शाहू स्मारक ग्रंथ लिहिल्याबद्दल मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. त्यांनी ग्रंथातून तत्कालीन उच्चवर्णियांनी शाहू महाराजांची केलेली बदनामी खोडून काढण्याचे काम केले. आता त्यांनी शिवचरित्र लिहावे.
महापौर हसिना फरास म्हणाल्या, कोल्हापूर ही शाहू महाराजांची आणि पुरोगामी विचारांची नगरी आहे. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा डॉ. जयसिंगराव पवार यांनी जोपासला आहे. केवळ इतिहासकार आणि लेखक न राहता ते समाजोत्थानाच्या कार्यात योगदान दिले आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ भूतकाळाचा वेध घेताना भविष्यासाठीही मार्गदर्शक आहेत.’
वसुधा पवार म्हणाल्या,‘डॉ. पवार यांच्या ५० वर्षांच्या कार्याची मी साक्षीदार आहे. त्यामुळे अनेक संशोधक, लेखक निर्माण झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत मी फिरले जिथे जाऊ तिथे आम्हाला जिव्हाळ््याची, प्रेमाची माणसं भेटली. वडील आणि सासरे यांच्या संस्कारांमुळे मी दुसऱ्यांच्या दु:खावर फुंकर मारायला आणि त्यांच्या यशात आपले यश मानायला शिकले.
प्रा. टी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. तनुजा शिपूरकर यांनी आभार मानले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, रजनीताई पाटील, संध्यादेवी कुपेकर, डी.बी.पाटील,‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्रविण गायकवाड, व्ही.बी.पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी खासदार निवेदिता माने, नंदाताई बाभूळकर, माजी आमदार के. पी. पाटील, संजय मंडलिक उपस्थित होते.
असा मी घडलो..
आपल्या जीवनाचा आढावा सत्काराला उत्तर देताना डॉ. पवार म्हणाले, माझ्या जडणघडणीत चार महत्त्वाच्या व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी माझ्या गावी शाळा सुरू केली म्हणून मी शेतकऱ्याचा मुलगा तिथे शिकू शकलो. वडिलांनी मला कोल्हापुरात प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगला पाठविले. तिथे शाहूंच्या सामाजिक समतेचा विचार वसतिगृहाच्या रूपाने संस्कारीत झाला. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यामुळे मी इतिहास संशोधन क्षेत्रात आलो. एम. ए. पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांनी मला मराठा इतिहास संशोधन विभागात नोकरी दिली आणि चोवीसाव्या वर्षी मी आयुष्यातला पहिला ग्रंथ महाराणी जिजाबाई यांच्यावर लिहिला. आता महाराणी ताराबार्इंवरील ग्रंथाचे काम पूर्णत्वास नेणार आहे.
अफझलखानाचा वध व इतिहास
शरद पवार म्हणाले,‘अनेक इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडताना हा राजा मुस्लीमद्वेषी होता अशी त्यांची प्रतिमा चितारली असून ती चुकीची आहे. त्यातून मुस्लीम समाजाबध्दल गैरभावना जोपासण्याचे काम झाले. हिंदवी स्वराज्य व्हावे यासाठी मुस्लीम बांधवांनीही पडेल ती किंमत मोजली आहे. शिवरायांच्या पायदळाचा प्रमुख नूर बेग हा मुस्लीमच होता. शिवरायांनी त्याचा धर्म नव्हे तर कर्तबगारी बघितली होती. अजूनही अफजलखानाच्या वधाचे वर्णन सांगतो. तो शौर्याचाच भाग आहे. दगाबाजीला असेच उत्तर दिले पाहिजे परंतू अफझलखान म्हणजे समस्त मुस्लीम समाज नव्हे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांना जसे मुस्लीमांशी लढावे लागले तसेच अनेक हिंदू राजांशीही झुंजावे लागले हे विसरता कामा नये.
शस्त्रास्त्र प्रदर्शनातून मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा :
मराठ्यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाची साक्ष असणाऱ्या मराठा तलवार, तोफगोळे, ढाल, वाघनखे अशा वैविध्यपूर्ण शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांच्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाला उजाळा देणारे शस्त्रात्र प्रदर्शनाचे उद्घाटन माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. केशवराव भोसले नाट्यगृहातील नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनामध्ये आयोजित हे प्रदर्शन आज, रविवारी दिवसभर सुरू राहणार आहे. प्रदर्शनात मराठा धोप, पट्टा, दांडपट्टा, गुर्ज, खांडा, आरमारी अशा वैशिष्ट्यपूर्ण तलवारी पाहण्यासाठी इतिहासप्रेमींनी गर्दी केली होती. याठिकाणी युद्धात वापरण्यात आलेले फु टलेले तोफगोळे, मराठा कट्यार, कुकरी, शिवकालीन कुलूप, चिलखत, जांबिया, भाला आदी ऐतिहासिक शस्त्रांत्रांचीही मांडणी करण्यात आली आहे.
शिवचरित्राचे शिवधनुष्य उचलणार..डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘माझ्याकडून शिवाजी महाराजांचे चरित्र लिहायचे राहून गेल्याची खंत मी व्यक्त केल्यानंतर गोविंद पानसरे मला म्हणाले, तुम्ही शिवचरित्र लिहाच.
मृत्यूनंतर पानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना मी शिवचरित्र लिहिण्याची शपथ घेतली. माझे शिवचरित्र बोटा-पोटाचे नसेल तर ते विश्लेषणात्मक असेल.
पाच वर्षांनी माझं एक कपाट असं असेल ज्यात शाहूंचे चरित्रग्रंथ १५ भारतीय भाषांमध्ये आणि १० विदेशी भाषांमध्ये प्रकाशित झालेले असतील आणि शिवचरित्र लिहिल्याशिवाय मी निरोप घेणार नाही.
महिन्याभरात छत्रपती राजाराम महाराजांवर लिहिलेले चरित्रग्रंथ प्रकाशित करणार आहे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.