राजस्थान पोलिसांची थकबाकी अखेर चुकती
By admin | Published: March 9, 2016 05:33 AM2016-03-09T05:33:20+5:302016-03-09T05:33:20+5:30
राज्यात सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी मागविलेल्या राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलाच्या थकीत देयकाची पूर्तता अखेर गृहविभागाने केली आहे.
जमीर काझी, मुंबई
राज्यात सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी मागविलेल्या राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलाच्या थकीत देयकाची पूर्तता अखेर गृहविभागाने केली आहे. निवडणुकीच्या कालावधीत सुरक्षेसाठी तैनात केलेल्या बंदोबस्तासाठीचा २९ लाख ६९ हजार ४६ रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश विभागाने दिलेले आहेत. बिलाच्या पूर्ततेसाठी राज्यस्थान पोलिसांकडून वारंवार पाठपुरावा सुरू होता.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने अन्य राज्यातून पोलीस बंदोबस्त मागविलेला होता. विशेषत: नक्षलग्रस्त जिल्ह्यात त्यांना नेमण्यात आलेले होते. त्यामध्ये राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलातील तीन कंपन्यांचा समावेश होता. ४ ते २२ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत त्यांचे सुमारे ३०० सशस्त्र जवान कार्यरत होते. १८ दिवसांच्या सुरक्षेच्या बदल्यात त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या मार्फत २९ लाख ६९ हजार रुपयांचे देयक गृहविभागाकडे पाठविले होते. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे ते प्रलंबित राहिलेले होते. त्यासाठी अधिकाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा सुरू होता. अखेर गृहविभागाकडून त्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या बिलांपैकी ५० टक्के रक्कम राज्य सरकारला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नागरीसुरक्षा व होमगार्ड विभागाकडून कालांतराने मिळू शकते. त्यासाठी राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलाची देयके दिल्याची पत्रके सादर करावी लागतात, असे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.