राजेंद्रअण्णा भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 01:15 AM2017-02-07T01:15:09+5:302017-02-07T01:15:09+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसला हादरा : सांगली जिल्ह्यात एकच खळबळ

Rajendra Anna in BJP | राजेंद्रअण्णा भाजपमध्ये

राजेंद्रअण्णा भाजपमध्ये

googlenewsNext

आटपाडी : आटपाडी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माणगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करून खळबळ उडवून दिली. कोणतीही अट न घालता किंवा विधानसभेसाठी तिकीट न मागता फक्त तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवा, एवढी एकच मागणी आहे. त्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केला, अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातून सर्वात प्रथम राजेंद्रअण्णा देशमुख यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गेले आठवडाभर त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू होती. त्यावर सोमवारी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने रविवारीच त्यांच्याकडे एबी फॉर्म दिले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांनी सर्व समर्थकांना भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यांचे पुत्र हर्षवर्धन यांनीही आटपाडी पंचायत समिती गणातून भाजपतर्फे अर्ज भरला. त्यानंतर सायंकाळी चार वाजता राजेंद्रअण्णा यांनी पत्रकार परिषदेत भाजपप्रवेशाचा निर्णय जाहीर केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी आटपाडीत येणार होते, मात्र पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे त्यांना येता आले नाही. मात्र त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आटपाडीत जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम घेणार आहोत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी दिली.
राजेंद्रअण्णा म्हणाले की, आटपाडी तालुक्यात ‘टेंभू’चे पाणी येऊन दोन वर्षे झाली, पण त्याचा शेतीला काहीच उपयोग झाला नाही. या पाण्याची आवर्तने ठरविणे यासह तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपविण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढविणार आहे.
त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख म्हणाले की, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खा. संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष देशमुख आणि तालुक्यातील नेते गोपीचंद पडळकर या सर्वांसोबत झालेल्या बैठकीत भाजपप्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. आम्ही राष्ट्रवादीवर नाराज नाही, पण तालुक्याचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. विधानसभेसाठी तिकीट मागितलेले नाही. पण पक्षाने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली, तर संपूर्ण तालुका, सर्व ताकद एकजुटीने त्यांच्यामागे उभी करू. आता जुना, नवा असा वाद नाही. फक्त ‘कमळ’ निवडून आणणे हे एकच ध्येय आहे.
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, राजेंद्रअण्णांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाला बळकटी आली आहे. त्यांनी पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन यापूर्वीही आपण त्यांना जाहीरपणे केले होते. आमच्या संघर्षामुळे काहीजण भानगडी करत होते. ब्लॅकमेलही करत होते. आता तालुक्याचे प्रश्न सुटतील. त्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बंडोपंत देशमुख, आप्पासाहेब काळेबाग, माणगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भगवानराव मोरे, भाऊसाहेब गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Rajendra Anna in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.