राजेंद्र गवईंनी काँग्रेसला दिले समर्थनाचे पत्र, फ्रंटमधून पडले बाहेर
By Admin | Published: January 29, 2017 05:42 PM2017-01-29T17:42:03+5:302017-01-29T17:42:03+5:30
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने रिपब्लिकन फ्रंटमधून बाहेर पडत थेट काँग्रेसला आपले समर्थन जाहीर केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने रिपब्लिकन फ्रंटमधून बाहेर पडत थेट काँग्रेसला आपले समर्थन जाहीर केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी समर्थनाचे पत्र काँग्रेसकडे सोपविले आहे. रिपाइंच्या रूपात निळा झेंडा सोबत आल्याने काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत रिपाइं स्वबळावर रिंगणात उतरली होती. काही दिवसांपूर्वी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांनी एकत्र येत रिपब्लिकन फ्रंट स्थापन केला होता. यात गवई यांच्या रिपाइंचादेखील समावेश होता. लोकमतशी बोलताना डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, रिपब्लिकन फ्रंटची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. एक तर काँग्रेस सोबत किंवा स्वबळावर, अशी आपली भूमिका आहे. फ्रंट स्थापन झाल्यानंतर नेते आपापल्या परीने काँग्रेसशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे मी आपली चर्चा करून मोकळा झालो. रिपाइंने बहुतांश जिल्ह्यात काँग्रेसला समर्थन दिले आहे. नागपुरातही आपण काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र काँग्रेसला दिले आहे. जागांच्या मागणीबाबत आपली काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. किमान पाच जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंजा चिन्हावर लढणार
काँग्रेसने जागा दिल्यानंतर आपल्या उमेदवारांनी कोणत्या चिन्हावर लढायचे याचा विचार सुरू आहे. चार सदस्यांचा प्रभाग आहे. तीन जागांवर पंजा आणि एका जागेवर रिपाइंचे चिन्ह राहिले तर प्रचारात आमच्या उमेदवारांची अडचण होऊ शकते. आता प्रचाराला पुरेसा वेळही राहिलेला नाही. त्यामुळे फक्त नागपूर महापालिकेत रिपाइंचे उमेदवार काँग्रेसचा ए-बी जोडून पंजावर लढू शकतात. आमच्या उमेदवारांच्या हितासाठी एवढी लवचिकता दाखवावी लागेल, असेही डॉ. राजेंद्र गवई यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.