राजेश टोपे यांना मातृशोक, आईच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 11:05 PM2020-08-01T23:05:03+5:302020-08-01T23:06:02+5:30
शारदाताई ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे यांच्या पत्नी आणि राजेश टोपे यांच्या मातोश्री होत्या.
मुंबई- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांच्या आईची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या जालना येथे त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कामाच्या व्यापामुळे टोपे यांना आईला भेटायलादेखील वेळ मिळत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. शारदाताई ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे यांच्या पत्नी आणि राजेश टोपे यांच्या मातोश्री होत्या.
कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं अजितपवार म्हणाले आहेत.