राजेगाव परिसर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: June 28, 2016 01:29 AM2016-06-28T01:29:11+5:302016-06-28T01:29:11+5:30

जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

Rajgaon area waiting for strong rain | राजेगाव परिसर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

राजेगाव परिसर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

Next


राजेगाव : जून महिना संपत आला तरी वरुणराजाची वक्रदृष्टी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे राजेगाव परिसरातील शेतकरीवर्ग आता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
ऐन उन्हाळ्यात भामा-आसखेड धरणातून दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी सोडलेले पाणी येथपर्यंत पोहोचले नसल्याने या परिसरात नदीचे विदारक चित्र दिसत आहे. पुणे परिसरातील धरण साखळीत दमदार पाऊस झाला तरच भीमा नदीला पाणी येऊन धरणात पाणी वाढेल, अशा प्रकारचा आशावाद परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. यापूर्र्वी भीमा नदीला कधी नव्हते इतके विदारक रूप आले आहे. उजनी धरण झाल्यानंतर गेल्या ४0 वर्षांत कधीही न आटलेली भीमा नदी राजेगाव परिसरात पहिल्यांदाच आटली आहे. वाळूउपसा, निसर्गाचा असमतोल आदींमुळे एकेकाळी सौंदर्याचे प्रतीक असलेली भीमा नदी भकास दिसू लागली आहे.
नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने या वर्षी दुष्काळाची झळ सर्वच व्यवसायांना बसली. तरीही भीमा नदीच्या सौंदर्याची काळजी घेण्याऐवजी अनेकांकडून नदीचे मोठे नुकसान करण्यात येत आहे.
खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वरुणराजाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
उजनी धरण हे पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यांतील शेतकऱ्यांना वरदानच ठरले आहे. या धरणांतील बॅकवॉटरच्या पाण्यावर या भागातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. मुबलक प्रमाणात मिळत असलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी ऊस हे प्रमुख पीक घेत आलेला आहे. त्यामुळे या परिसरात अनेक साखर कारखाने उभे राहिले आहेत. असे असले तरी दुष्काळाशी दोन हात करत शेतकरी आपल्या जमिनींची मशागत करून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. (वार्ताहर)
>चिंता वाढली : मशागतींना वेग

Web Title: Rajgaon area waiting for strong rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.