'कृष्णकुंज'वर राज- भुजबळ यांची अडीच तास भेट, चर्चेला उधाण
By admin | Published: December 6, 2015 12:22 PM2015-12-06T12:22:18+5:302015-12-06T12:22:18+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 'कृष्णकुंज' येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल अडीच तास भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क सुरू आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 'कृष्णकुंज' येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तब्बल अडीच तास चर्चा केल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकलेल्या भुजबळ यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट घेतली याचीच चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र आपण कोणत्याही राजकीय हेतून नव्हे तर राज ठाकरे यांच्या मातोश्री आजारी असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी पत्नीसह कृष्णकुंजवर गेलो होतो, असा खुलासा भुजबळ यांनी केला आहे.
रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी भुजबळ यांचे आगमन झाले. त्यानंतर तब्बल अडीच तास ते तेथेच होते, सकाळी १० च्या सुमारास ते राज ठाकरेंच्या घरून रवाना झाले.
या भेटीदरम्यान नक्की काय चर्चा झाली हे सांगण्यास भुजबळ यांनी नकार दिला. राज ठाकरेंच्या मातोश्री व आपली पत्नी या दोघी मैत्रिणी असून राज यांच्या मातोश्रींची तब्येत बरी नसल्याने त्यांना भेटून विचारपूस करण्यासाठीच आम्ही कृष्णकुंजवर गेलो होतो. ठाकरे व भुजबळ कुटुंबियांमध्ये राजकारणापलीकडे मैत्रीपूर्ण संबंधही आहेत आणि आजची भेट ही त्याकरिताच होती, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.