राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंचे निधन, सावंतवाडीवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:25 PM2018-07-18T23:25:20+5:302018-07-19T06:58:38+5:30

बडोद्याच्या राजकन्या तथा सावंतवाडी राजघराण्याच्या राजमाता सत्वशीला देवी शिवरामराजे सावंत भोसले (८३) यांनी बुधवारी रात्री ९.१४ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

Rajmata Satvashiladevi Bhosale passed away, mourning at Sawantwadi | राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंचे निधन, सावंतवाडीवर शोककळा

राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंचे निधन, सावंतवाडीवर शोककळा

googlenewsNext

सावंतवाडी : बडोद्याच्या राजकन्या तथा सावंतवाडी राजघराण्याच्या राजमाता सत्वशीला देवी शिवरामराजे सावंत भोसले (८३) यांनी बुधवारी रात्री ९.१४ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, राजमाताच्या निधनाचे वृत्त सावंतवाडीत पसरताच राजवाड्यात मोठी गर्दी झाली होती. राजमाता या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यातच त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी येथील राज घराण्याच्या स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बडोदा घराण्याच्या राजकन्या सत्वशीला देवी भोसले यांंचा विवाह सावंतवाडीचे राजे शिवराम राजे भोसले यांच्याशी झाला होता. त्या सावंतवाडीत शिवरामराजे यांच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. शिवरामराजे यांच्या निधनानंतर त्यांची सर्व भिस्त ही राजमातांवर होती. राजमातांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. शिक्षणक्षेत्रात तर त्यांनी आमूलाग्र क्रांती घडवून आणत पंचम खेमराज महाविद्यालयाचा कारभार योग्य प्रकारे हाताळला. आज त्यांच्यामुळेच या महाविद्यालयात वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू आहेत.

त्यांनी राजघराण्याचा वारसा ही योग्य प्रकारे जपला होता, गंजिफा हे सावंतवाडीचे खास वैशिष्ट्य होते. या ऐतिहासिक कलेला बळ देण्याचे काम राजमातांनी केले होते. परंपरा असताना कालौघात ती हळूहळू लोप पावू लागली. ऐतिहासिक काळाचा वेध घेतान इथे १७ व्या शतकात लाखकामाला सुरुवात झाली. त्या कालावधीत सावंतवाडीच्या राजघराण्याने या कलेला राजाश्रय दिला होता. ही कला लोप पावत असताना पुन:श्च राजमातांनीच या कलेचे पुनरुज्जीवन केले. राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीमुळेच ही कला इथे पुन:श्च ऊर्जितावस्थेत आली आणि आपले परंपरिक रूप सांभाळून जागतिक बाजारपेठेत जाऊन पोहोचली आहे. यांचे सर्व श्रेय हे राजमातांनाच दिले गेले पाहिजे. राजमातांच्या या कलेची नोंद अमेरिका तसेच इतर जगातील देशांनी ही घेतली होती.

दरम्यान राजमाता या अलिकडच्या काळात वृद्ध झाल्याने त्यांनी थोडी विश्रांती घेतली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र गेल्या एक महिन्यापासून त्यांना थोडे अस्वस्थ वाटत असल्याने येथील राजवाड्यातच ठेवण्यात आले होते. वैद्यकीय टीम सतत प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत चालला होता. त्यातच बुधवारी रात्री ९.१४ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, यावेळी मुलगा खेमसावंत भोसले, सून शुभदादेवी भोसले, नातू लखमराजे भोसले आदी उपस्थित होते. राजमाता यांच्या निधनाचे वृत्त सावंतवाडीत पसरताच एकच हळहळ व्यक्त होत आहे. राज घरण्याची भिस्त शिवरामराजे यांच्यानंतर समर्थपणे हाताळण्याचे काम राजमातांनी केले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने सर्वांनीच दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. राजमातांवर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अ‍ॅड. श्यामराव सावंत यांनी लोकमतशी बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांनी राजमातांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं.

- सावंतवाडी राजघराण्याच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
पालकमंत्री, दीपक केसरकर 
 

Web Title: Rajmata Satvashiladevi Bhosale passed away, mourning at Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.