राजना उद्धवचा नो रिस्पॉन्स!
By admin | Published: January 31, 2017 05:17 AM2017-01-31T05:17:21+5:302017-01-31T05:17:21+5:30
महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांचा काडीमोड झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टाळीसाठी पुढे केलेला हात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झिडकारला
मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांचा काडीमोड झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टाळीसाठी पुढे केलेला हात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झिडकारला असून, युतीसाठी कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही, आम्ही स्वबळावर राज्य भगवं करणार आहोत, असे सांगत उद्धव यांनी आज शिवसेना-मनसेच्या युतीची शक्यता फेटाळली.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे रविवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर युतीचा प्रस्ताव घेऊन गेले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे तेथेच होते. मात्र, ते नांदगावकर यांना भेटलेदेखील नाहीत. ‘आल्या पावली कोणाला तसेच पाठविणे बरे दिसणार नाही, तो (बाळा) काय म्हणतो ते ऐकून घ्या,’ असे ठाकरे यांनी त्या वेळी तेथे असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले. त्यानुसार खा. अनिल देसाई, आ. अनिल परब आदी नांदगावकर यांच्याशी बोलले, असे सूत्रांनी सांगितले. नांदगावकर यांनी दिलेल्या प्रस्तावाची माहिती या नेत्यांनी नंतर उद्धव यांना दिली. एकमेकांपासून दुरावलेले दोन भाऊ एकत्र येणार का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली. तथापि, उद्धव यांच्या वक्तव्यानंतर अशी युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले. (विशेष प्रतिनिधी)
नकाराची तीन कारणे?
गेल्या काही निवडणुकांत मुंबईमध्ये शिवसेनेला मनसेचा फटका बसला. विशेषत: २००९ची विधानसभा निवडणूक आणि २०१२मधील महापालिका निवडणुकीत मनसेच्या मतविभाजनामुळे शिवसेनेला नुकसान सहन करावे लागले होते. ते सगळे विसरून राज ठाकरेंना जवळ का करायचे? असा ‘मातोश्री’वरचा एकूण सूर होता.
सेनेने मनसेला सोबत घेतल्यास ८० टक्के फायदा हा मनसेलाच होईल आणि मनसेला नवसंजीवनी मिळेल, असा मतप्रवाह शिवसेनेत असल्याने शिवसेनेकडून युतीसाठी टाळी दिली गेली नाही, असेही म्हटले जाते.
सेना आणि मनसे या दोघांचीही मदार मुख्यत्वे मराठी मतांवर आहे. मनसेचा प्रभाव घटत असताना ही मते आपल्याकडे खेचून मनसेने गेल्या वेळी मिळविलेल्या जागा आपल्याकडे खेचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
- स्वत: उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना मनसेशी खुली वा छुपी अशी कोणतीही युती नको होती. त्यामुळेच उद्धव यांनी मनसेच्या प्रस्तावाला प्रतिसाद तर सोडा पण असा प्रस्तावच आलेला नाही, अशी भूमिका घेत मनसेच्या मनसुब्यांवर पाणी फिरले.
स्वबळावर लढणार!
शिवसेना आगामी निवडणुकीत कोणाशीही युती करणार नाही. तसा प्रस्तावदेखील कोणाकडून आलेला नाही. नव्या पर्वाची घोषणा आम्ही केलेली आहे आणि स्वबळावरच राज्य भगवं करण्याचा आमचा निर्धार आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहोत.
- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख
मी युतीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला होता
दोन भावांनी एकत्र यावे ही माझी आणि माझ्यासारख्या अनेकांची इच्छा आहे. मनसेचा युतीचा प्रस्ताव घेऊन मी ‘मातोश्री’वर गेलो होतो, त्यासंदर्भात चर्चादेखील केली. स्वत: राज ठाकरे यांनी २२ तारखेपासून सातवेळा उद्धव यांना फोन केले. गेल्या वेळी आम्ही ज्या जागा जिंकल्या त्या आम्हाला द्या. जे नगरसेवक आम्हाला सोडून शिवसेनेत गेले त्यांच्या जागांबाबतही आम्ही आग्रही नव्हतो. अजूनही वेळ गेली नाही. आम्ही आशावादी आहोत. - बाळा नांदगावकर, मनसेचे नेते