रजनीश सेठ एमपीएससीच्या अध्यक्षपदी; रश्मी शुक्ला नव्या पोलीस महासंचालक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:22 PM2023-10-03T19:22:27+5:302023-10-03T19:25:51+5:30
Rashmi Shukla DGP News: राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या कथित आरोपावरून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. यानंतर हालचाली सुरु झाल्या होत्या.
राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या कथित आरोपावरून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. यानंतर चार दिवसांनी शुक्ला यांची महाराष्ट्रात वापसी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
डीजीपी रजनीश सेठ 31 डिसेंबरला निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी सेठ यांची नियुक्ती केली आहे. यानंतर शुक्ला या राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असणार आहेत. त्या सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सशस्त्र सीमा बलच्या महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर दुसरा गुन्हा पुणे पोलिसांनी दाखल केला होता. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. हे सर्व गुन्हे रद्द केल्यानंतर आता शुक्ला यांना पुन्हा महाराष्ट्रात येण्याची संधी मिळणार आहे.